☆ कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
प्रेम प्रेमच असते
त्याला लांबी रुंदी नसते
ऊंची जाडीही नसते
नव्हे कसलीच भूमिती नसते…
प्रेम प्रेमच असते
त्याला वय नसते
वेळही नसते
कसली चौकटही नसते……
प्रेम प्रेमच असते
काय पाहिलंस तिच्यात
ना रंग ना रुप ना आकार
प्रेमात या प्नश्नाला ऊत्तर नसते…
प्रेम प्रेमच असते
कधी मृदु कधी कठोर
कधी अबोल कधी शब्दात असते
सदैव दवबिंदुत भिजलेले असते
प्रेम प्रेमच असते
मातीच्या बोळक्यांवर असते
लेकुरवाळ्या परिवारावर असते
नाति चरामी या शपथेवरही असते……
प्रेम प्रेमच असते
तालात असते सुरात असते
भूपाच्या शांतरसात असते
ठुमरीच्या शृंगार रसातही असते….
म्हणून म्हणते
प्रेम प्रेमच असते
आभाळात मावत नसते
प्रेमाचा रंग कोणता ?माहीत नसते….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈