सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सईचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले . पळत लांब निघालेल्या त्या स्त्रीला तिने मनापासून आश्वासन दिलं, आणि त्या क्षणी त्या तान्हुलीची जणू खरीखुरी आई झाली ती.–

हॉर्न वाजला तशी सई भानावर आली. हळूच डोळे पुसत ती सलोनीला अलगद हातात धरून गाडीत बसली. अगदी शांत गाढ झोपलेली त्यांची छकुली—दोघेही एकटक तिच्याकडे पहात राहिले होते काही वेळ, आणि मग निघाले—सलोनीच्या घरी—त्यांचा हा निर्णय सासर -माहेरच्या सगळ्यांनीच मनापासून स्वीकारला होता. त्यामुळे घरी सलोनीचं जोरदार स्वागत झालं.

आणि मग एखादी कळी अलवार उमलावी, तशी सलोनी हळुवार उमलत गेली–आणि हे दोघं तृप्त होत राहिले. घरात कशाचीच वानवा नव्हती. ती अगदी लाडाकोडात वाढत होती. तिला हवं ते शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य होतं. आणि आता शिक्षण उत्तमरित्त्या पूर्ण झालं होतं–बघताबघता ती लग्नाला आली होती .

तिला अठरा वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हाच मानसोपचार-तज्ञांच्या सल्ल्याने आणि मदतीने, सई आणि सचिन तिचे खरे आईवडील नसल्याचं तिला योग्यप्रकारे सांगितलं होतं. अशावेळी अशी बहुतेक मुलं, आपण ज्यांना आईवडील म्हणत आलोय, ते आपले खरे जन्मदाते नाहीत, आणि खरे आईवडील कोण हे कुणालाच माहिती नाही, हे पचायला अतिशय अवघड असं कटुसत्य कळल्यावर प्रचंड बिथरतात, विचित्र, बेताल वागायला लागतात हे  डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं–आणि दोघांनाही त्याचंच प्रचंड टेन्शन आलं होतं. सलोनी आपल्याला दुरावणार तर नाही ना, या भीतीने मने धास्तावली होती. पण तिला कधीतरी हे कळणं गरजेचं होतं. आजपर्यंत इतर कुणी भोचकपणाने  तिला हे सांगितलं नव्हतं ही त्यातल्यात्यात जमेची बाजू होती. सलोनीला सत्य कळताच तीही अपेक्षेप्रमाणेच वागायला लागली होती. ७-८ दिवस त्या दोघांशीही अजिबात बोलली नव्हती. पण डॉक्टरांचं कॉन्सेलिंग प्रभावी ठरलं आणि एक दिवस उठल्याउठल्याच रडत येऊन ती सईच्या गळ्यात पडली. हमसून-हमसून रडली. मग हळूहळू शांत झाली. तिच्या मनावरचं मळभ दूर झाल्याचं जाणवत होतं. — ”आई, मला पटलंय — मला जन्माला कुणीही घातलं असलं तरी माझे खरे आई-बाबा तुम्हीच आहात  आणि तुम्हीच रहाल . तुमचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे मला माहितीये . आणि माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही सोडून दुसरे कोणी माझे आई-बाबा असूच शकत नाहीत.” —आणि सगळ्यांच्याच मनाचा बांध फुटला. त्या क्षणी तिघांमध्येही एक समृद्ध घट्ट नातं नव्याने जन्माला आलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. तिला आश्रमातून आणतांना झालेला आनंद मोठा, की हा या क्षणाचा आनंद मोठा ,हा प्रश्नच निरर्थक ठरला असता. —-आणि आता बघताबघता सलोनी लग्न करण्याइतकी मोठी झाली होती. तिचा तिनेच जोडीदार निवडला होता—अतिशय डोळसपणे. उत्तम स्थळ होतं . मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. –आणि लग्न आता अवघ्या चार दिवसांवर आलं होतं .लग्नानंतर अर्थातच ती अमेरिकेला जाणार होती—यापुढे सलोनी दुसऱ्या कुणाचीतरी होणार या विचाराने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं –आणि आज इतक्या वर्षांनी अचानक तिला ती बाई आठवली— झाडामागे लपून का होईना, स्वतःच्या मुलीला शेवटचं बघण्यासाठी आसुसलेली– इतक्या दुरून तिला आशिर्वाद देणारी–मनावर कायमचा दगड ठेवून तिथून लांब पळत गेलेली—– सईला प्रकर्षाने जाणवलं —–त्या बाईला समाजाने लाथाडलं होतं , आणि आपण अतिशय सन्मानाने जगत आहोत, हा जमीन-अस्मानाचा फरक दोघींमध्ये असला, तरी दोघींमधली आई अगदी एकसारखीच तर आहे—–दोघींच्या भावनाही त्याच–कासाविशी तीच– आणि मुलीच्या विरहाने मनाला होणाऱ्या वेदनाही त्याच——पण कदाचित तिच्या या सगळ्या भावना जरा जास्तच तीव्र होत्या-असतील, कारण ती तर आयुष्यात पुन्हा कधीही तिच्या मुलीला दुरूनही पाहूसुद्धा शकणार नाहीये. पण माझं तसं नाही——सईला प्रकर्षाने जाणवून गेलं ….

समाप्त 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments