श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 78 ☆ पाचोळा ☆
मी मृत्यूच्या काठावरती बसून आहे
मृत्यू पुरता माझ्यावरती रुसून आहे
काठावरती ऐकू येते खळखळ त्याची
याच मृत्युने केली आहे माझी गोची
कळते त्याला मी तर गेलो खचून आहे
झाडावरती सडून जाणे नको नशिबी
दाणे भरले छाटा आता लवकर ओंबी
पडूदेत रे फळ जे गेले पिकून आहे
फळा फुलांना हिरवी पाने कवेत घेती
पानगळीचा ऋतू कसा हा खुडतो नाती
डोळ्यांमधले गेले पाणी सुकून आहे
आठवणींचा पाडा होता माझ्या सोबत
त्याच त्याच त्या जुनाट गप्पा असतो मारत
भूतकाळ तो रोज काढतो पिसून आहे
आत्मा गेला देहाचे ह्या हलके ओझे
तरी वाटते छानच आहे नशीब माझे
पाचोळा मी तरी मातिला धरून आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈