☆ जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा १३ . तीन मासे
एका नदीच्या खोल जलाशयात तीन मासे राहत होते. त्या तिघांपैकी एका बुद्धिमान माशाने पाण्याची स्थिती लक्षात घेऊन यापुढे जलाशयात पाणी राहणार नाही हे जाणले. त्याने त्या दोघा माशांना बोलावून सांगितले की “ उन्हाळ्यात या जलाशयातील पाणी कमी होईल तेव्हा कोळी येऊन जाळे पसरवून आपल्याला पकडतील व ठार मारतील. तेव्हा आपण जर प्रवाहाबरोबर हळूहळू दुसऱ्या जलाशयाकडे किंवा समुद्राकडे गेलो तरच आपले प्राण वाचतील. इथेच राहिलो तर संकटे ओढवतील.” बुद्धिमान माशाचे बोलणे ऐकून इतर दोघे त्याला हसले व त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा तो मासा एकटाच ते जलाशय सोडून प्रवाहाबरोबर दुसऱ्या जलाशयात गेला.
काही काळानंतर उन्हाळा आल्यावर जलाशयाचे पाणी कमी कमी होऊ लागले.तेव्हा ही संधी साधून एक कोळी तेथे आला. त्याने जाळे पसरवून त्या दोघा माशांना पकडून जलाशयाच्या तीरावर आणले. त्यातील एक मासा एक उपाय करून स्वतःला मृतवत् भासवत निश्चल राहिला. दुसरा मात्र वारंवार उड्या मारत होता. तेव्हा कोळ्याने त्याच्यावर आघात करून त्याला मारले. कोळी दूर गेलेला दिसताच तो पहिला मासा हळूहळू जलाशयापर्यंत सरकून झटकन उडी मारून त्यात प्रवेश करून सुरक्षित राहिला.
तात्पर्य – भविष्यात येणाऱ्या संकटांचा आधीच विचार करणारा सहज सुखी होतो. संकट आल्यावर बुद्धिबलाने योग्य उपायांनी प्रतिकार करणाऱ्याला सुखप्राप्ती होते. दैवावर अवलंबून राहिल्याने अनभिज्ञ व्यक्तीचा विनाश होतो.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी