सौ ज्योती विलास जोशी
☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-4 ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
(करोनाचं हे दुसरं भूत….)
पाटणकर पोटतिडकीने सांगत होता……
“भूत दादा,आई-बापाविना आम्ही भावंडे!मोठ्या प्रेमाने भावाने आम्हाला इथवर आणले. उच्चशिक्षित झालो,डॉक्टर झालो. आता गावात राहून कसं चालणार ?पोटापाण्याचं काही बघू की नको? पण खरं सांग, सेवाच करतोय ना रे मी सर्वांची ? मग, विठू का रुसला ? वारी का नको म्हटला?” असे म्हणून पाटणकर रडू लागला. आम्ही त्याला सावरलं. आत्ता कुठे पाटणकर खरं खरं बोलायला लागला होता.
“मग तुझी सुटका कशी झाली?” मी मुद्द्याचा प्रश्न विचारला.
“अरे काय सांगू तुम्हाला?” असे म्हणून पाटणकरचे डोळे चमकले. आम्ही त्याला नकळत हरभऱ्याच्या झाडावर चढवले होते.
“भूतच मला सांगू लागले; अरे तुझा विठू ना परवा मला तुझ्या सोबतच दवाखान्यात दिसला. तो पीपीई किट घालून अगदी आम्हा भुतांसारखा दिसत होता. तुझ्या बरोबरीने काम करत होता तो! तूहि त्याला ओळखलंच नाहीस. आम्हा सारखी अशी अनेक भूतं मानव सेवेत लागली आहेत. भुतासारखच काम करतात सगळे. त्यात तूहि आहेस. काय सांगतोस? तुला कसे ठाऊक की विठुराया माझ्यासोबत होता ते? मी भुताला विचारले.
अरे, मला नंतर भेटला तो आणि म्हणाला,यंदा मानवजातीवर कसलेसे संकट आले आहे म्हणे! त्यानं अनेक माणसे आजारी पडायला लागली आहेत त्यामुळे दवाखान्यात काम प्रचंड वाढलं आहे.
माझे वारकरी अथक काम करताहेत. देशाचे पंतप्रधानही अहोरात्र काम करतातहेत. सर्वजण त्यांच्या सादेला प्रतिसाद देत आहेत. पण हात अपुरे पडायला लागलेत रे!
मी ठरवलं, यंदा आपणच मदतीलाधावून जायचं भक्तांच्या. तेवढाच खारीचा वाटा! पंढरी सोडून इथेच आलो आहे मी! म्हणून माझ्या वारकऱ्यांना भक्तांना मी वारीला येऊ नका,कायिक नाही तर मानसिक वारी करा असं म्हणालो.
बरं, सर्वांना चंद्रभागा रुसली आहे असे का बरं वाटलं? ती तर दुथडी भरून वाहते आहे व सगळ्यांना आलिंगन द्यायला उत्सुकआहे.सगळ्या वारकऱ्यांनी उगाच गैरसमज करून घेतला आहे झालं.
बाबा रे, मग तू का माझ्या मानगुटीवर बसला आहेस ?का माझा पिच्छा पुरवतो आहेस? काय हवय तुला? मी भुताला मार्मिक प्रश्न विचारला.”
सडेतोड स्वभावाच्या पाटणकर कडून स्वप्नातही असा बिनधास्त जाब विचारणं अपेक्षितच होतं. उत्सुकता होती ती भुताच्या उत्तराची!…….
क्रमशः….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈