सौ ज्योती विलास जोशी
☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-5 ☆ सौ ज्योती विलास जोशी☆
(करोनाचं हे दुसरं भूत….)
आता भूतही इरेला पेटलं…..
“भूत म्हणालं, मीच करोना भूत आहे.”
मी हादरलो. ज्या विठुरायाकडे याच करोनाला नष्ट कर म्हणून आम्ही वारकरी साकडं घालतोय त्याचीच तक्रार मी करोनाकडे केली.
काय करून बसलो मी हे? आता विठुराया माझ्यावर नक्कीच रुसणार! मी अगदी दिग्मूढ झालो!”
“अरे बापरे! काय करायच रेआता?” आम्ही तिघांनी पाटणकरला आणखी संकटात टाकलं.
“मी भुताच्या हाता पाया पडू लागलो. विनवणी करू लागलो. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून आर्जव करू लागलो.
त्यावर ते म्हणालं,माझ्याकडे एक करारनामा आहे.त्यावर अखिल मानवजातीची सही हवी आहे ती घेऊन दे, मग मी जातो.
मी करारनामा वाचला आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्वांच्या वतीने सही केली.
भुताची माझ्या मानेवरची हाताची पकड सैल झालीआणि ते गडगडाटी हास्य करीत छूमंतर झालं. मीही पळत सुटलो.”
“अरे पण होतं तरी काय त्या करारनाम्यात ? पूर्ण वाचलास का करारनामा? कशावर सही करून आलास?” पाटणकर स्वप्न वर्णन करतो आहे हे आम्ही एव्हाना विसरलो होतो. आम्हा सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजलं होते.
“वृक्षवल्लीशी सोयरीक करा, प्रदूषणविरहित हवा राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा, प्राणी मात्रांवर दया करा, निसर्गाशी मिळतेजुळते घ्या हे आणि असे बरेच मुद्दे त्यात होते.”
“आणि तू सही केलीस?”
“होय, पर्यायच नव्हता दुसरा! कधी माझी या भुतापासून सुटका होते असू झालं होतं मला. मी त्या करारनाम्यावर सही केली आणि सुटकेचा श्वास सोडला. ‘करोना गेला, करोना गेला’ असे ओरडत सुटलो जणू हर्षवायू झाला होता मला.”
“मग?”
“अरे, मग काय? मला कोणीतरी जोरजोरात हलवत होतं…. आणि म्हणत होतं…… उठा! आज आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी त्या दळभद्री, कपाळ करंट्या करोनाच नाव कशाला घेताय ? विठुरायाला आळवा. उठा!”
“मग?”
आमचं ‘मग’ काही संपेना. पाटण्या बोलतच राहावा असं वाटत होतं. “मग काय…… उठलो तर साक्षात रुक्मिणी डोळ्यासमोर! आणि रेडिओवर आशाताई गात होत्या…….
‘अजि म्या ब्रह्म पाहिले.’
समाप्त
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈