डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शारदा संगीत” – श्री प्रकाश नारायण संत ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

संतांच्या ‛वनवास’ या कथासंग्रहाचा पुढचा भाग म्हणजे ‛शारदा संगीत’! आई- वडिलांपासून दूर आजी- आजोबांकडे नुकताच राहू लागलेला लंपन वनवासमध्ये चित्रित केला आहे. तर कोवळ्या वयातून हळूहळू मोठा झालेला लंपन शारदासंगीतमध्ये चित्रित केला आहे. आई- वडिलांना सोडून आज्जी – आजोबांकडे राहायला लागल्यामुळे आपल्याला वनवासी समजू लागलेला लंपन आता थोडा mature झाला आहे. सुमीशी त्याची गट्टी जमली आहे. त्याचेही एक विश्व तयार झालेले यात दिसून येते.

एकूण पाच दीर्घकथांचा यात समावेश आहे. वनवास मधील गोंधळलेला लंपन ‘शारदा संगीतमध्ये’ आजूबाजूच्या वातावरणात रमलेला दिसतो.त्याचे वर्तुळ अधिक विस्तारलेले दिसते. या कथांमध्ये केवळ व्यक्तीच नव्हे तर त्याच्या खेळण्याचा अविभाज्य भाग असणारे ग्राउंड, आगगाडीचे रुळ, घसरगुंडी या निर्जीव घटकांना पण एकप्रकारची संजीवनी देऊन लेखकाने सजीवत्व प्राप्त करुन दिले आहे. शिवाय म्हापसेकर मास्तरांची शांत पण शिस्तप्रिय असणारी प्रतिमा, उच्चपदस्थ असूनही अतिशय नम्र व माणुसकी जपणारे जमखंडीकर, मास्तरांच्या अनुपस्थितीत तितक्याच सक्षमपणे क्लास चालू ठेवणारी लक्ष्मी, सरस्वती केरुर, ‛परचक्र’ कथेतील जीवनातील एक काळी बाजू दाखविणारे  करसुंदीकर अण्णा व त्यांचे कुटुंब लंपनचे अनुभवविश्व अधिक समृद्ध करुन जातात.

त्यांच्या लेखनाची एक सिग्नेचर स्टाईल होती. “मॅड स्वैपाकघर, एकदम बेष्ट, मॅडसारखा झोपून गेलो, काजूबीयांचे रिक्रुट, सुमीने आणि मी एकोणीस तास शोध घेतल्यानंतर मांजराचे पिल्लू सापडले, बाबांशिवाय इतर बविसशे लोक तिथे होते” अशी  वाक्ये वाचताना संतांची ती विशिष्ट शैली जाणवते. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील गावात त्यांचे हे बालपण गेल्यामुळे त्या भाषेचा एक विशिष्ट बाज वाचकाला सुखावून जातो. आणि प्रत्येकाच्याच मनात दडलेला तो लंपन शब्दांच्या माध्यमातून वाचकाला सापडतो. म्हणूनच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments