सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माती किती शहाणी असते ना? तशी ती दगडापासून बनते.  पण मातीजवळ सृजनाची एक वेगळीच ताकद आहे. दगडाचा कठीणपणा मातीला नाही. तिच्या जवळ दगडात असलेलीच मूलद्रव्य आहेत. पाणी शोषून घेण्याची क्षमता मात्र फक्त मातीकडं! दगड थोडेसे ही पाणी शोषून घेऊ शकत नाही. पाणी शोषून घेऊन मातीचा मात्र चिखल होतो. वरवर जो चिखल वाटतो, तो सहजपणे कशालाही चिकटतो. असं लाघव दगडाजवळ नाही. ऊन्हानं, पावसानं दगड झिजतो, तडकतो पण याच ऊन-पावसानं माती सुगंधीत होते. सगळ्या विश्वाला आधार देण्यासाठी सज्ज होते. तिच्या रंध्रारंध्रातून जीवन अंकुरते. तिच्या गात्रागात्रातून इवलाली हिरवी पानं टाळ्या वाजवू लागतात. हिरवळीचा गारवा सगळ्या सजीव सृष्टीला थंडावा देतो. छोटे छोटे जीव जिवाणू तिच्या कुशीत वाढू लागतात. आधार शोधतात. आनंदानं, ऊत्साहानं जीवन जगतात. शेवटी धावून धावून थकतात तेंव्हा तीच हात पसरून सगळ्यांना सहजपणानं सामावून घेते. मातीतच मिसळल्याशिवाय, एकरुप झाल्याशिवाय शांती नाही. माती लागू नये म्हणून आयुष्यभर जपलं तरी मातीतच माती होऊन मिसळण्याची आस शेवटी लागतेच. ही आस तरी कशासाठी? नव्यानं अंकुरण्यासाठी!, पुनःश्च पालवण्यासाठी!!

कवयित्री  इंदिरा संत म्हणतात,

रक्तामध्ये ओढ मातीची

मनास मातीचे ताजेपण

मातीतून मी आले वरती

मातीचे मज अधुरे जीवन

केशवकुमार मात्र ‘होता डोंगर माथ्यावर पडला धोंडा भला थोरला’ …. असं म्हणत दगडातही काव्य शोधतात. खरंतर दगड केव्हढा सामर्थ्यवान! किती कठीण! म्हणूनच तो भक्कम इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येतो. कित्येक मजली उंच टोलेजंग देखण्या वास्तूंचा पाया बळकट करतो. तरीही नुसता दगड इमारत बनवू शकत नाही. दोन दगड सांधायला चिकट मातीच लागते.

काही दगड सागरगोटे बनून अल्लड सान हातात खेळत राहतात. गोफणीतून भिरकावलेला दगड शेतातील पिकांचे रक्षण करतो. तर लगोरीचा दगड ववात्रटपणाचा शिक्का घेऊन कैऱ्या, चिंचा पाडतो.

दगडाला टाकीचे घाव घातले की तो देव बनतो. गाभाऱ्यात सजवला जातो. पूजला जातो.

पायरी ओळखून पायरीशीच थांबणारे काही

असले तरी, देवाआधी त्यांनाच पहिला नमस्कार मिळतो. काही दगड कळसावर सुवर्ण कलश घेऊन सजतात.

हाच दगड कोरीव नक्षीकामानं सजवला की, महालांची, राजवाड्यांची शोभा वाढवणारा खांब बनतो. एखादा कुशल कारागीर त्यातून सारेगमचे सप्तसूर उमटवतो. कोरीव शिल्पकाम करून कुणी शिलाकार त्या दगडाला इतिहासाच्या कागदावर कायमस्वरूपी कोरुन ठेवतो.काही दगडांना पाटीचा, सरस्वती पूजनाचा मान मिळतो. काही दगडांना शीलालेखानी अजरामर केले. पाऊस, पाणी, ऊन, वारा यांना वर्षानुवर्षे तोंड देत तो इतिहासाचा साक्षीदार बनतो अनेक पिढ्यांना शौर्य, शृंगार, धैर्य, देशप्रेमाच्या रसात चिंब करतो. संगमरवरी असेल तर ताजमहाल बनून प्रेमकहाणी सांगतो….. तरीही.. तरीही… जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी मातीलाच नतमस्तक होतो.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments