सुश्री सुमती जोशी
☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 2) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
अशोक खूप चालला होता. सोमेश्वर शाळा अजून किती दूर आहे, हे त्याला समजेना. खेडवळ लोकांना विचारून खरा अंदाज येणं कठीण. एक सायकलस्वार समोरून येताना दिसला. अशोकनं त्याला विचारलं, “सोमेश्वर शाळा किती दूर आहे?”
सायकल चालवता चालवता तो उत्तरला, “लई दूर हाय.”
पाण्याचा एक ओहळ होता. आंब्याच्या एका झाडाची छोटीशी सावली पडली होती. बॅग ठेवून तो मटकन खाली बसला. बायकोनं निघताना न्याहारी आणि पाणी बरोबर दिलं होतं. रोजच देत असे. केव्हापासून तो तहानेनं व्याकूळ झाला होता. बॅग उघडून चाचपडूनही हाती काही लागलं नाही. न्याहारीची पिशवी गेली कुठे? पुस्तकं बाहेर काढून बघितलं. पिशवी कुठेही दिसेना.
क्षणभर विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं. प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात पुस्तकं घेताना आपण खाण्याची पिशवी बाहेर काढली होती. घाईघाईत ती पुन्हा आत टाकायची राहिली. एखादा दिवस असा काही वाईट उगवतो…असा विचार करत अशोक उठला. ऊन मी म्हणत होतं. भुकेमुळे पोटात खड्डा पडला होता. अशा ठिकाणी एखादं हॉटेल सापडणंही मुश्कील. बस स्टँडपर्यंत तरी असंच चालत राहायला हवं. समोरून एक मध्यमवयीन माणूस येत होता. कदाचित शेतावरचं काम उरकून येत असावा. अशोकनं त्यालाच विचारलं. समोर बोट दाखवत तो उत्तरला, “याच रस्त्यानं सरळ जा.”
हाच रस्ता शाळेकडे कुठे वळण घेतो, ते अशोकला समजेना. आता सरळ चालत राहायचं. कोणाला विचारायच्या भानगडीत पडायचं नाही. चालता चालता शाळेपाशी पोचेन.
उशीर होत होता. रणरणत्या उन्हाचा ताप वाढतच होता. नदीकिनाऱ्याच्या तापलेल्या वाळूवरून येणाऱ्या गरम वाऱ्यामुळे डोळे चुरचुरू लागले होते. डोकं तापलं होतं. अशोक झपाझप पावलं टाकू लागला. समोर झाडापानांच्या आडोशाला वस्ती दिसू लागली. तेच गाव असावं, असं त्याला वाटलं.
नदीच्या काठावरून रस्त्यानं एक वळण घेतलं आणि तुरळक घरं दिसू लागली. सगळी सिमेंटची पक्की घरं. सुखवस्तू लोकांचं गाव आहे तर! दोन वर्षांपासून गावं पालथी घातल्यामुळे आता अशोकला गावात पाय टाकल्याबरोबर त्या गावाची कुंडली मांडता येऊ लागली होती. या गावातली मुलं पुस्तकं खरेदी करू शकतील, अशोकनं अंदाज केला. गावातले रस्ते बरेच रुंद दिसत होते, पण रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. एक अद्भुत स्तब्धता वातावणात पसरली होती. जुन्या काळातलं एक घर दिसत होतं, बाजूला तळं. आमराई मोहरली होती. त्याचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. आता कोणाला विचारायची गरज नाही. समोरच दिसतंय खेळाचं मोठं मैदान आणि बाजूला शाळेची दुमजली इमारत. भिंतीवर मोठया अक्षरात पाटी लटकावली होती, ‘सोमेश्वर हायस्कूल.’
खेडेगावात शहरासारखी एवढी मोठी शाळा असेल, असं अशोकला वाटलं नव्हतं. या शाळेत नक्कीच खूप मुलं शिकत असतील. आता मात्र कोणी दिसत नव्हतं. सगळीकडे निरव शांतता, स्तब्धता भरून राहिली होती. तो चपापला. शाळा का बरं बंद असावी? इतकं चालून आलो खरा, पण…
तो थबकला. आता मात्र त्याचे प्राण कंठाशी आले. इतक्यात व्हरांडयात कोणाची तरी चाहूल लागली. मुलांना शाळेला सुट्टी असेल, पण शिक्षक शाळेत काम करत असतील. शाळेच्या चारी बाजूला मजबून भिंत आणि समोर लोखंडी दरवाजा. अशोकनं आत डोकावून पाहिलं. दोन्ही बाजूंना मोठा व्हरांडा होता आणि ओळीनं सगळ्या वर्गांचे दरवाजे बंद होते. दुसऱ्या मजल्यावर शाळेचं ऑफिस असावं. समोरच्या जिन्यावरून तो दुसऱ्या मजल्यावर आला. तिथेही तीच निरव स्वब्धता. त्यानं इकडेतिकडे पाहिलं. माणसांचा वावर नव्हता. तेवढयात त्याला समोर कोणाची तरी चाहूल लागली. बॅगेच्या ओझ्यानं त्याच्या पाठीला रग लागली होती. बॅग खाली टेकवून पुढे जाऊन त्यानं मोठयानं विचारलं, “कुणी आहे का तिकडे?”
जवळच्या एका खोलीतून एक मध्यमवयीन, धोतर-शर्ट घातलेला, किरकोळ माणूस बाहेर आला. अशोककडे एकटक पहात त्यानं विचारलं, “कोणत्या प्रकाशनसंस्थेतून आलात?”
“एका छोटया संस्थेतून. आपण कोण?”
“मी सनातन. शाळेचा शिपाई. आज कोणी शिक्षक नाहीत, त्यामुळे आज काम होणार नाही.”
”कोणीच नाही?” अशोकाचा कंठ दाटून आला.
“उद्या सुट्टी आहे. परवा सगळे भेटतील. तुम्ही परवा या.”
क्रमश: ….
श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
अनुवाद – सुश्री सुमती जोशी
मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈