☆ विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
‘ ती नसताना ‘
मी नसताना …. कल्पनेने…..मी पुरुषी कल्पनेतून पतीचे पत्नीबद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय…..
तिच्या श्वासतील ऊबेने मी रोमांचित होत असताना, मला अचानक जाग आली….आणि बघतो तर ‘ती’ नव्हती जवळ…ती ४ दिवसांसाठी ट्रीपला गेली होती. मी विचार करू लागलो की……किती सुखद भास होता तो! मग मी उठून सगळ्या खोल्यात फीरलो…ती नाहीए कुठेही हे माहित असतानाही…मी सर्व खोल्यात गेलो…कारण मला अनुभवायचं होत ती! त्या त्या खोलीत असतानाची… कल्पनेतील तीच वास्तव्य, विचार करता जाणवलं की आभासी असलं तरीही सुखावणार होत! कारण गेल्या अनेक वर्षात ती असताना मी ते अनुभवलं होत.
देवघरात देवाची पूजा करताना….त्या देवांची ठराविक जागा,तिचे अथर्वशीर्ष,श्रीसुक्त म्हणणे, फुल घालताना ती सर्व देवांशी त्यांची नाव घेऊन बोलते!ते तिलाच जमत, आणि तिला जे जमत ते मला आवडत!?
आम्ही दोन दिवसात ओट्यावर खूपच पसारा करून ठेवलाय…पण पसारा किती केलाय म्हणून आता ओरडायला ती नाहीए…नेहमी नाही पण, तीही पसारा करते कधीतरी…पण ते आवरण्याचं चातुर्य, time मॅनेजमेंट,चटपटीतपणा तिलाच जमत सगळं…कारण ह्या आम्ही केलेल्या पसाऱ्यात मला तर आवरायला नक्की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहिए. ?
फ्रिज मध्ये दूध आणि ताकाच पातेलं बघून खूप गोंधळ झाला, वास व चव घेऊन बघता ताक व दुध कोणत.. हे लक्षत आलं.किती साधी सोपी गोष्ट, पण ती करते सगळं म्हणून कधी फार लक्ष दिल गेलं नव्हतं.
तिच्या कवितेच्या डायरीची एक एक पान उलटली… आणि तीची कवितेची साहित्याची ओढ आणि तिचे विविध विषयांवरील लेख कविता किती सध्या भाषेतील पण प्रगल्भ विचार आहेत हे लक्ष्यात आलं. कवितेतील जास्त काही मला कळत नाही पण त्यात माझ्यावरील काही कविता होत्या…मी त्या जोरात म्हणू लागलो आणि जणू तीच त्या कविता म्हणत आहे असा भास मला होत होता…. तीच ते कवितांचं सादरीकरण… त्यात माझयाबद्दलची रोमँटिक कविता… त्यात हळूच तीचं माझ्याकडे चोरून बघणं… लाजण…. मी सगळं जणू कल्पनेनेच पण खरंखुरं अनुभवत होतो!
मुलांच्या कपड्याच कपाट उघडून मी आत बघणार तोवर सगळे कपडे धाडकन अंगावर पडले..मग परत आठवली ती, तीव्रतेने….मुलांचे कपडे धुवून कसे नीटनेटके ठेवते..आता तर ह्या कपड्यात धुतलेले कळेना, न धुतलेले कळेना.
कधीकधी वाटायचं …काय करते ही? घरी असते,पण हिला कुठं काय इतकं काम असत?
पण साखर सम्पली तेव्हा गुळ घालून चहा केला… तेव्हा आठवली ती! Emergency बटाट्याच्या काचऱ्या कशा करायच्या हे तिने शिकवलेलं होत ते करताना आठवली ती! भाताचा अंदाज किती वेळा सांगितला होता तिने, पण कधी प्रयत्नच नाही केला…शिकलो असतो तर आलं असतआज,असा विचार करताना आठवली ती! पोळ्या तर विकतच आणल्या आम्ही…पण तीचं पोळी लाटतानाच दृश्य समोर आलं, खरच ती किती गोल व लुसलुशीत पोळ्या करते हे बाहेरच्या पोळ्या तोडताना जाणवलं, तीच घरासाठी करणं हे मनापासून असत आणि त्यात तिचा जीव असतो. ती अनेकदा काही स्तोत्र म्हणत स्वयंपाक करते, त्यावर तीच वाक्य मला नेहमी च पटत की त्या स्तोत्रामधून positive vibration अन्नात उतरतात, आणि ते शरीर व मनासाठी खूप पोषक व सकारात्मक असतात, हितकारक असतात.
बारीक बारीक गोष्टीत मला आठवत आहे ती! आठवते म्हणण्यापेक्षा उणीव भासते अस म्हणावं लागेल.
हे, कुलदेवता, वास्तुदेवता तुझ्या आशीर्वादाने ह्या वास्तूतील वस्तू आम्ही घेतल्या, ज्या भौतिक रूपाने मला फक्त माहिती आहेत. पण ‘ती’चा प्रत्येक वस्तू मध्ये प्राण आहे,आत्मा आहे . त्या सर्वानाही आमच्यापेक्षा तीच जास्त हवी असते अस जाणवलं.
ती नसतानाची वास्तूही, ‘ती’ च्या केवळ विचारांनी, कल्पनेने आनंद देते, सकारात्मक ऊर्जा देते, मला, मुलांना, आमच्या गॅलरी मधील झाडांनाही…मग ती असतानाची वास्तू व प्रसन्नता, ती असतानाचे नंदनवन काय वर्णू?
बोलताना आणि जगताना…बाला, प्रेमला आणि वत्सला अशा विविध रूपातील ती, खूप साधी….
येताजाता तिच्या बांगडयांच्यां मंजूळ नादाने, पावलांच्या लगबगिने, कधी गोड प्रेमळ बोलण्यातून,तर कधी स्पष्टवक्ते पणाने, आपले विचार मांडणारी…
‘ती’… माझी अर्धांगिनी?
ती नसतानाही…ती स्पर्शली!!!!?
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈