सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
वर्क फ्रॉम होम, ही कनसेप्ट आता साऱ्या जगभर दुमदुमते आहे. या बाबतीत कुणाला काही माहिती नाही असे नाही किंबहुना त्याचे महत्व ही आता सगळ्यांना पटायला लागले आहे. अर्थात हे काम इंजिनियर्स, टिचर्स. ऑफीस वर्कर्स यांच्याच साठी अॅप्लिकेबल आहे असेच मानले जाते.
पण खरं सांगू का? शतको न शतके आपल्या संर्वांच्या घरातील महिला, गृहिणी वर्क फ्रॉम होम करतच आल्या आहेत. पण त्यांच्या कामाची, कष्टाची कोणीही दखल घेतली नाही. अन् घेतली जाणार ही नाही. घरीच असते म्हणजे घरातील कामे तिचीच असेच गृहीत धरले जाते. ती कामे करताना ती किती दमून जाते याचा कोणी विचारच करत नाही. ऑफीसचे काम घरामधून केले की निदान त्याचा रिटर्न पगाराच्या रुपामध्ये मिळतो. बँक बॅलेन्स वाढत जातो. एक प्रकारे मानसिक शांतता ‘ ऊ ब, समाधान नकीच मिळते. मात्र गृहिणी ना तेवढा आधारही नाही. पगार वाढ करा म्हणून संप करू शकत नाहीत की हौसेनं एखादी वस्तू मनात आले म्हणून घेऊ शकत नाही.
काही वर्षापूर्वी मलेशियाला जाण्याचा, तिथे रहाण्याचा मला योग आला होता. तेव्हा तिथल्या मित्रांना यांनी घरी जेवायला बोलावले होते. आपल्या पद्धती प्रमाणे मी जेवण वाढत होते. साधे मीठ वाढले, भांड्यात प्यायला पाणी घातले तरी ते प्रत्येक वेळी ‘ थँक्यू ‘ म्हणत होते. पहिल्यांदा ते थँक्यू ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यात पाणी जमायचेच बाकी राहिले होते. मला आपल्या सगळ्यांच्या घरातल्या आई, आजी काकू, मावशी, आत्या सगळ्या सगळ्या आठवल्या. आयुष्यभर संसाराचा रामरगाडा ओढला तरी एकदाही तिला ऐकायला मिळाला नसेल ‘ धन्यवाद’ शब्द !
अर्थात आपल्या कडे तशी अपेक्षा नाही आणि प्रथा तर नाहीच नाही. पण घरातल्या कोणीतरी मनापासून दखल जरी घेतली तरी तिला आणखीनच काय करण्याचा उत्साह येतो. पण गृहीत धरणे हे आपल्या कडे रुटीन असल्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष्य जात नाही.
असे दुर्लक्ष्य फक्त महिलांचे होते असेही नाही. पूर्वी एकत्र कुटुंब काळामध्ये मोठ्या व्यक्तिचा घरावर दरारा असायचा, दबदबा असायचा. त्याचाच लहान भाऊ किती जरी कर्तबगार असला, तरी त्याचे एका शब्दानेही कौतुक होत नसे. त्याची दखलही घेतली जायची नाही. हे कुणाच्या लक्षातही यायचे नाही.
आजच्या वर्क फ्रॉम होम मुळे निदान सर्वांना गृहिणीचे अस्तित्व, कर्तृत्व अन् महत्व समजायला लागले आहे असे आपण आनंदाने मानूया.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈