☆ जीवनरंग ☆ बोध कथा – स्वामीनिष्ठा ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा १४ . स्वामीनिष्ठा
विशालपूर नगरात एक राजा होता. तो शूर राज्यकर्ता होता. धर्माचे पालन करीत न्यायानुसार प्रजेचे व राज्याचे संरक्षण करीत होता.एकदा त्याला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या शत्रूने त्याच्या नगरावर आक्रमण केले. युद्धात राजाला पराजित व्हावे लागले. या पराजयाचे त्याला अतोनात दुःख झाले. तो नगराचा त्याग केलेला व केवळ एकाच मंत्र्याची साथ लाभलेला राजा अरण्यात आला. तिथेसुद्धा तो शत्रूच्या भयाने कुठेही अधिक काळ थांबू शकत नव्हता. काट्याकुट्यातून, तीक्ष्ण दगडांवरून पादत्राणे-विरहित, चालण्यास असमर्थ असलेला, तहान-भुकेने व्याकूळ झालेला, ‘पुढे काय करावे?’ या विचाराने चिंताग्रस्त झालेला तो राजा एका तलावाकाठी विश्रांतीसाठी थांबला. आपल्यावर ओढवलेल्या या घोर संकटातही आपली साथ न सोडता आपल्याबरोबर येणाऱ्या त्या मंत्र्याला पाहून राजाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या व त्याला खूप वाईटही वाटले.
“हे मंत्रिवर, माझे संपूर्ण राज्य नष्ट झाले. माझे हत्ती, घोडे, रथ, सैन्यही राहिले नाही. माझ्यावर फार मोठे संकट ओढवले आहे. आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही. पराजित होऊन अशा मरणयातना भोगण्यापेक्षा जलसमाधी घ्यावी किंवा कड्यावरून दरीत उडी घ्यावी किंवा अग्निप्रवेश करावा असे मला वाटत आहे” अशा प्रकारे विलाप करणाऱ्या राजाचे ते बोलणे ऐकून मंत्र्याचे हृदय विदीर्ण झाले.
राजाला दुःखातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने मंत्री म्हणाला, “महाराज, कालवशात आपले राज्य नष्ट झाले तरी मरण पत्करणे हा त्यावर उपाय नाही. तेव्हा मरणाचे विचार मनात येऊ देऊ नका. जे आपले शत्रू आहेत तसेच ह्या शत्रूराजाचे देखील शत्रू असणारच. त्यांच्याशी मैत्री करून, युद्धाची सज्जता करून, शत्रूचा पाडाव करून पुन्हा नवे राज्य स्थापित करा. नष्ट झालेले राज्य पुनश्च प्राप्त होत नाही असे मुळीच नाही. अमावास्येच्या दिवशी चंद्राच्या सर्व कला क्षीण होतात. तोच चंद्र पुन्हा शुक्लपक्षात वृद्धिंगत होतोच ना? अशाच प्रकारे आपलाही उज्ज्वल काळ येणार व परमेश्वराच्या कृपेने आपलेही मनोरथ पूर्ण होणारच!”
मंत्र्याच्या ह्या प्रेरणादायी वचनांनी राजाचे नैराश्य एकदम दूर झाले. तो प्रफुल्लित झाला. योग्य प्रयास करून, सर्व सैन्य एकत्रित करून राजा युद्धासाठी सज्ज झाला. युद्धात शत्रूला नमवून पुन्हा राजपदी आरूढ झाला. त्या मंत्र्यासह त्याने चिरकाळ राजेपद उपभोगले.
तात्पर्य – राजाच्या पदरी बुद्धिमान व निष्ठावान मंत्री असले तर ते ओढवलेल्या संकटांवर योग्य उपायांद्वारे मात करू शकतात.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी