श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ नियम सृष्टीचा ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
हृदयाच्या गर्भातील लाव्हा
जेव्हा जेव्हा उसळतो
बांध मनीचा बघ कसा
माघारी त्या फिरवितो.
पण उद्रेक त्याचा होई जेव्हा
जीव वेडा तळ मळे.
सुख वेदनांचे काय असते
तेही बघ, तेव्हाची कळे
जलाशयाच्या आत्म्याला
तो ग्रीष्म जेव्हा तपवितो
बाष्प रूप करण्या धारण,
जीव कसा हो तळमळतो
पण बरसताच जलधारा
मनमोर कसा नाचतो
मोद नवयौवनाचा वसुंधरेला तेव्हाची कळे.
धरतीच्या पोटात
बीज वृक्षाचे जेव्हा पडते
उष्म्याच्या प्रभावी
बघ ते कसे गुदमरते
जलधारा त्या मृगाच्या
अंगार कसा हो शमविते
अंकुरण्याचा, तरू बनण्याचा आनंद मग
तेव्हाची कळे
तळमळणे, गुदमरणे.
अंकुरणे, बहरणे
सळसळणे, डोलणे
नियमसृष्टीचे सत्य असे
वेदनेविना सुख न मिळे
हेच खरे
हो हेच खरे
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Very good heart tuching poem