श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ भाई… भाग -1☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
भाई, चला आवरलंय माझं. उशीर होईल नाहीतर खेळाला पोचायला.
आग सुनिता, थांब एवढ शेवटचं पान लिहितोय, पण कुठला खेळ ?
काय हे भाई, “भाई” सिनेमाचा पहिला शो.
सुनीता अग या हिंदुस्थानात भाईचा सिनेमा फक्त ईदला येतो. मार्गशिर्ष कृष्ण १४ ला अमावस्येच्या पूर्वसंध्येला येणारा हा कुठला ‘भाई’ ?
भाई, बास झालं हा माझी फिरकी घेणे. ज्याने आयुष्यात अनेक अमावस्यां सोसून मराठी सारस्वताच्या दुनियेत ‘पोर्णीमा’ खुलवली त्या भाईचा म्हणजे तू अर्थात “पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे” यांच्या वरचा ‘भाई ‘ सिनेमा.
बरं बरं. त्या उबेराला विचार राफेल तयार आहे का?
काय? भाई कालच्या संसदेतील चर्चा फारच मनावर घेतलीयस तू? त्या रंभेला सांगून २०१९ लोकसभा होई पर्यत केबल बंद करायला सांगते.
त्या कुबेराला पुष्पक विमान तयार आहे का असं म्हणायचंय का तूला?
हो. हो तसेच
भाई, त्यांनी आधीच सांगितले आहे पुष्पक तयार आहे तुम्हाला मुंबईकर, नागपूरकर का पुणेकर म्हणून जायचंय?
बघ सुनीता, त्या नागपूर मधील उणे तापमानातील थंडी काही आपल्याला सहन व्हायची नाही, १२ अंश तापमानाला गिरगावकर, पार्लेकर, डोबिवलीकराना जणू इकडे काश्मीर, महाबळेश्वर अवतरलं असे वाटत असलं तरी तिकडे मराठी सिनेमा कुठे लागला आहे हे हुडकण्यात आपला वेळ जाईल
*तेव्हा आपले पुणेच बरे*
माझ्या मनातलं बोललात भाई
अग सुनीता तो बघितलास का अंतू बर्वा, ‘ बटाट्याच्या चाळीत ‘ कुठली स्कीम घेऊन गेलाय. ‘असामी असामी’ व ‘अपूर्वाई’ पुस्तक घेतल्यास ‘भाई’ सिनेमाचे एक तिकीट मोफत असं ओरडत सुटलाय
अमॅझीग ना भाई?
नाही सुनीता कलियुगात त्याला ‘अमेझॉन’ का काय म्हणतात ?
घ्या आता हेच बघायचे राहिले होते मी म्हणतच होतो ‘सखाराम गटनेने’ अजून ‘व्हाट्सअप वर’ चारोळी कशी पाठवली नाही ते. बघ काय म्हणतोय तो :-
हेल्मेट सक्तीने पुण्यात
सगळ्यांना आली ‘फिट’
अन ‘भाई’ ऐन हिवाळ्यात
एकदम होणार ‘हिट’
आपलाच – सखाराम गटणे
चितळे मास्तरांनी तर आज शाळेच्या मुलांना सहलीला नेतो म्हणून ‘भाई’ दाखवायचं ठरवलं आहे, बरं का सुनीता
भाई किती प्रेम आहे तुझे तुझ्या या पात्रांवर आणि त्यांचे तुझ्यावर. आता फक्त एवढे सांगू नकोस की ती रत्नागिरी – मुबंई बसच्या वाटेत हातखंब्याला आडवी आलेली
“म्हैस” कोथरूडला सिटीप्राईडचा प्रागंणात रवंथ करत लाडक्या ‘भाईची’ वाट बघतेय आणि तिने दिलेल्या शेणाच्या गोण्यांची शेकोटी करून ‘नाथा कामत’, नंदा प्रधान, अण्णा वडगावकर, नामू परीट, गजा खोत, रावसाहेब तिकीटाच्या रांगेत उभे आहेत.
?
अगदी बरोबर सुनीता, आणि तो नारायण तिकीटाच्या रांगेत स्वतःच्या नावाचा दगड ठेऊन, सगळ्यासाठी पॉपकॉर्न रूपी लाह्या फुटाणे आणायला पळालाय.
किती चेष्टा करशील सुनीता तू माझी, हे काय वय आहे का? आपण स्वर्गात आलोय आपण आता पुण्यात नाही आहोत. काल रात्री झोपेत काय गाणं बडबडत होतीस माहीत आहे?
‘भाई भाई, व्यक्ती वल्लीचा, कसा सिनेमा घडला, बाई बाई’
नशीब ‘आचार्य अत्रे’ बाजूला ढाराढुर झोपले होते नाहीतर आज काळी पूर्ण गाण्यांसह
‘झेंडूच्या फुलांचा’ हार गळ्यात पडला असता आपल्या
भाई, ते जाऊ दे. चला ना जरा लवकर निघून मस्त पर्वतीवर जाऊन सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊ.
मी तर म्हणतो सुनीता एक दिवसाची रजा टाकू स्वर्गात. तू म्हणतीस तसे पर्वतीवर जाऊ, सारसबागेत जाऊन स्वेटर घातलेल्या बाप्पाचे दर्शन घेऊ, सिनेमा बघू, आणि हो तुझ्या मनातले
तुळशीबागेत संध्याकाळी जाऊ, सर्व देव -गणांसाठी चितळ्यांची अंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊ आणि *सगळ्यात महत्वाचे* रात्री मुक्कामाला डेक्कनला “मालती – माधव” मधै जाऊन त्या चोराने पुस्तकाचा घातलेला पसारा आवरु अन सकाळच्या
आपल्या लाडक्या ‘दक्खनच्या राणीने’ मुंबई पर्यत जाऊ.
परतीचे पुष्पक विमान मुंबई हुन सोडण्याची विनंती करायला भाई चित्रगुप्तां कडे गेले. पाठमो-या भाईंकडे पाहताना सुनीता ताईंना त्यांचे गुणगुणे ऐकू आले
हृदयांबुजी लीन लोभी अली हा !
मकरंद ठेवा लुटण्यासी आला !
बाधी जीवाला सुखाशा मनी !!
*मर्म बंधातली ठेव ही* !!!
*भाई, खूप खूप शुभेच्छा*
© श्री अमोल अनंत केळकर
३/१/१९
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com