श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 2☆ श्री अरविंद लिमये ☆

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. म्हणून म्हटलं. फार अंधार करू नका.”

“आण्णा?” त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.”

“मला आधी का कळवलं नाहीत? आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय. डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं. तू उगाच काळजी करतेस.”

“आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी… मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”

“तसं म्हणजे करतो आपलं मला जमेल ते… जमेल तसं…”

“का?” तिने तीव्र शब्दात विचारलं.

“का म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम. ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला…सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं? आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की. दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या? तेही या वयात? वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते. गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकल वरून एखादातरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए.. वेडी आहेस का तू? तू..तू तिला यातलं कांहिही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं? दादाशी तरी मी बोलणारच. चांगली खडसावून विचारणाराय”

“सावू… हे बघ, तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल. ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”

हे खरं की खोटं तिला समजेचना. ती अगदी हळवी होऊन गेली. आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.

“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले. तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..

“सावू, हे बघ, शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते. सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो. तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला. अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”

“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”

“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’ असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो. मी जायला नको होतं हे त्या  पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”

सविता विचारात पडली हे सगळं असंच असेल? आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.

“सावू, तुला सांगू? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक. माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची. पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय. सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं. पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची. याच बाबतीत नाही सावू, तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”

सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं.  “माझ्यावरील प्रेमापोटी सावू, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं. जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”

“कोणती गोष्ट आण्णा?”

क्रमश:….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments