☆ विविधा ☆ कांदेपोह ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

संध्याकाळची वेळ होती. टेरेवर वनिता फेऱ्या मारत होती. आपण किती चाललो हे पाहण्यासाठी सोबत मोबाईल ही होता. आवडती गाणी ऐकत शांत फिरण्यातील मौज काही औरच होती.तो आनंद घेत असताना मोबाईलची रिंग वाजली. बघते तर भाचीचा होता.ही प्राची पुण्यात जाॅब करते.” हं… बोल प्राचू,काय म्हणतेस?”

“अगं… अतू आज ना… मी मुलगा बघायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली.”

“तूला कसा वाटला तो? काय करतो? कसा दिसतो? कुठे असतो?”

“अगं किती प्रश्न ते? हे बघ त्याचा फोटो आणि त्यांचे सगळे डिटेल्स मी तुला सेंट केले आहे.  मग मला कळव. तुला कसा वाटला तो? या बाबत तूच माझी गुरू आहेस बरं. बरं फोन ठेवते, मला एक काॅल येतोय रात्री निवांत बोलू,बाय..बाय..आय लव्ह यू.”

फोन कट झाला.

मनात आले. ही पिढी किती प्रक्टिकल आहे. बरोबर चूक हा भाग पुढचा. ही पिढी उगाच गुंतून पडत नाही. त्रास करून घेत नाही.भाऊ माहिती पाठवतो. मग प्राची पुण्यात नोकरी सांभाळत मुलांना बघते. ते ही एका हाॅटेल मध्ये एकटी जाते. बोलते. विचारांची देवाण घेवाण होते.हे सारं किती सुटसुटीत छान आहे. एका क्षणात माझे मन भूतकाळात गेले. आमच्या वेळी पस्तीस, चाळीस वर्षा पूर्वी घरात मुलगी बघायला पाहुणे येणार म्हणजे किती गडबड, किती लोकांची ऊठबस, किती तयारी, किती दमणूक होत असे.

घर स्वच्छ करा, बैठकीची खोली सजवा, ठेवणीतल्या कपबश्या काढा स्वच्छ करून ठेवा, कांद्यापोह्यानची तयारी करा, कांदेपोहे सुधा एकदम स्पेशल. त्यात शेंगदाणे हवेत, बटाटा हवा, खोबरंकोथिंबीर हव, लिंबू,बारीक शेव हवी. किती मिजास असे पोह्यांची. असे गरमागरम पोहे समोर आले की सगळं विसरायला होत असे. एवढ करून ही मुलाला बिधास्त बघता येत नसे. बघण्यांची चोरी. कुठेन तरी लांबून, एखाद्या फटीतून चोरुन बघाच आणि मग अंदाज करत बसायचं यातला नेमका नवरदेव कोण? मुलीला बघताना मुले आपल्या सोबत तीन चार मित्रांना हमखास घेऊन येत, साडी सांभाळत खाली मान घालून बसायचं, चोरट्या नजरेने बघायचं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हळू आवाजात उत्तरे द्याची. आपली इच्छा असली तरी मुलाला प्रश्न विचारण्यांची हिंमत नसायची. घरातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आधी दटावून ठेवलेले असायचे तुझा शहाणपणा तुझ्या जवळ ठेव. तिथं वर तोंड करून काही बोलून आपली अक्कल पाजळू नकोस. खर तर परक्या माणसा समोर जाताना आधी मनात भिती असायची, चारचौघात बोलण्यांची सवय नसायची, मग  काय बऱ्याच वेळा ततपप व्हायच. अश्या वेंधळा मुली लगेच पसंतीला उतयाच्या. पुढे ही मुलगी घरात निमुट वागेल असा अंदाज बांधला जायचा. खर तर बऱ्याच मुलीच्या मनाचा तिथे चोळामोळा होत असे. तिच्या विचारांना फारशी किंमत नसे.ती मिळवती असली तरी ही. घराण्यांची अब्रु जायला नको म्हणून बोलायचे नाही. चांगल्या वळणाची, सुसंस्कृत, शिवणटीपन करणारी, स्वयंपाकपाणी करणारी अशी किती तरी लेबलं चिटकवली जायची. ती मुलगी मात्र मुक. घरच्या पुढे चालत नसे. बऱ्याच वेळा मुलींची फसगत होत असे. दोघांनी भेटून मन समजून घेणे खुप पुढची गोष्ट. पुन्हा एकदा बघण्यांची पध्दत नव्हती, लग्न नंतर समजे तिला आवडलेला मुलगा नेमका मुलाचा मित्र होता. मग काय आलीया भोगाशी असावे सादर. हसतमुख राहून संसार नेटका करावा लागे.

माझ्या बाबतीत तर अजून वेगळे आम्ही पाच भावंडे.दोन बहिणी मोठ्या तर एक छोटी. भाऊ माझ्या पाठीवर.मोठ्या बहिणीना बघायला येणार त्याना त्रास नको म्हणून प्रत्येक वेळी घर आवरण्या पासून पोहे करे पर्यंत सगळं कामे मी करत असे. पोहे इतके बनवले की डोळे बांधून ही आज  बनवेन. पण माझ्या वेळी मात्र घरी कोणीच नव्हते. मीच घर आवरायचे, बैठकीची खोली सजवायचे, पोहे करायचे, साडी नेसून पाटावर बसायचे. किती वेळा पाहुण्याना पत्र व्यवहार ही मीच करे. मी यात एकदम तंज्ञ झाले.

प्राचीमुळे आज इतक्या वर्षांनी आठवणींना उजाळा मिळाला. आज काल अशी झंझटे नाहीत. हाॅटेल मध्ये सगळं तयार असतं, कसली आवरा आवर नाही, सजावट नाही, कांदेपोहे नाहीत, मनावर दडपण नाही, सगळ कस मस्त मोकळं. मुलामुलीना आपलं मत मांडता येते, एकमेकांना जाणून घेता येते. अडचणी मांडता येतात, हे सारं चांगले आहे. याचा पुरस्कार व्हायला हवा. मुलीनां ही एक व्यक्ती म्हणून वागणूक दिली जात आहे दिली गेली पाहिजे. लग्न ठरवताना मुला मुलीचा बाजार होता कामा नये.

आजवर कांदेपोह्यांनी अनेक संसार उभारले, जीवनात आनंद पेरला, आज संकल्पना बदलत आहे. मुलामुलीची बघण्यांची ठिकाण बदलत आहेत. खाण्यांचे पदार्थ बदलत आहेत पण लग्न जुळवण्याचा विषय आला की कांदेपोहे समोर येतातच त्यांचे लग्न जमवण्यात अतूट नाते आहे. आता फेऱ्या मारताना माझ्या समोर हा भूतकाळाचा का उभा राहावा? काही झालं तरी एकमेकांना समजून घेण्यासाठी, नातं दृढय करण्यासाठी काही तरी निमित्त हवं असतं ते निमित्त आजवर समाजाने त्या कांदेपोहे यात शोधले यात त्यांचा काय दोष?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments