श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ देवा…. ☆श्री तुकाराम दादा पाटील ☆
मातलेले संपवा वेताळ देवा
द्या जगाला मोकळे आभाळ देवा
मागण्यांना आज माझ्या कौल द्यावा
तू मलाही अंतरी सांभाळ देवा
धर्म जाती भेद सारे फार झाले
तेवढे आता तरी गुंडाळ देवा
दु:ख भोळ्या काळजाला त्रास देते
अंतरंगी तू जरा गंधाळ देवा
भक्त सारे रंक होते शांत होते
तेच झाले रे तुझे गोपाळ देवा
भावना कपटी मनाला तू दिलेल्या
त्याच सा-या पापिणी हेटाळ देवा
दाखले ते भामट्यांचे जीवघेणे
सांगण्याला केवढे लडिवाळ देवा
चांगली होती किती बिघडून गेली
माणसे झाली कशी चांडाळ देवा
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर गजल