श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट – ‘हॅडल विथ् केअर’ ..भाग 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र:- आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज मात्र तुला ते सांगणं मला गरजेचं वाटतंय. “कोणती गोष्ट आण्णा..?)

“तुझा विश्वास नाही बसणार सावू, पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वैपाक मला कधीच आवडायचा नाही. तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं.तुझ्या वहिनीनं स्वैपाक केला असेल, तेव्हा ती आसपास नसताना, तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं कांहीबाही रांधून मला खाऊ घालायची. आज ती नाहीय. पण कसं कुणास ठाऊक, आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वैपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. हीसुध्दा सगळं मनापासून आणि प्रेमाने करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे. फरक आपल्या दृष्टिकोनात असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात. आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने ती आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत. एक सांगतो ते कायम लक्षात ठेव. नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूक असतात. त्यांना ‘हॅंडल वुईथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात. नात्यांचं खऱ महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं सावू. एकटा, केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी. पण तुझ्या दादा-वहिनीने मला समजून घेतलं. सांभाळलं. म्हणूनच त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरु शकलो.

त्या दोघांवर अचानक टाॅर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.

“गप्पा संपल्या की नाही अजून?” दादाने विचारलं. दादा वहिनी दोघंही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली  इतकं अंधारून आल्याचं त्याना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं. पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता. सगळं कसं लख्ख दिसू लागलं होतं. सविता तटकन् उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारख़ रडत राहिली. ती असं का करतेय दोघांनाही समजत नव्हतं.

“अण्णा काय झालं हिला असं अचानक!” दादानं विचारलं.

तिला काय झालंय ते फक्त आण्णानाच माहीत होतं. पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.

“काही नाही रे. तिला तिच्या आईची आठवण झाली असेल.  म्हणून तिला बिलगलीय.”

अण्णा बोलले ते अनेकार्थांनी खऱ होतं. निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशीए काही. सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती…!!

समाप्त

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments