☆ जीवनरंग ☆ बोध कथा – वस्तूचे मूल्य ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा १५ . वस्तूचे मूल्य
कृष्णानदीच्या तीरावर सावरीच्या झाडावर एक बगळा रहात होता. एकदा त्याने त्या मार्गाने जाणाऱ्या एका हंसाला पाहून त्याला बोलावले व विचारले की, “ तुझे शरीर माझ्या शरीराप्रमाणे शुभ्र रंगाचे आहे. फक्त पाय व चोच लाल रंगाची आहे. तुझ्यासारखा पक्षी मी आजपर्यंत पहिला नाही. तू कोण आहेस? कुठून आलास?”
हंस म्हणाला, “मी ब्रम्हदेवाचा हंस आहे. मी मानससरोवरात राहतो. तिथूनच आलो आहे.” बगळ्याने पुन्हा विचारले, “तिथे कोणत्या वस्तू आहेत? तुझा आहार कोणता?” हंस उत्तरला, “तिथे असलेल्या सगळ्या वस्तू देवांनी निर्मिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सौंदर्य वर्णन करणे शक्य नाही. तरी त्यापैकी काही मुख्य वस्तूंचे वर्णन करतो ते ऐक. तिथे सर्वत्र सुवर्णभूमी आहे. अमृतासारखे जल, सोनेरी कमळे, मोत्याची वाळवंटे, इच्छित वस्तू देणारा कल्पवृक्ष आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तू आहेत. मी सुवर्णकमळांचे देठ खातो.”
ते ऐकून “तेथे गोगलगायी आहेत की नाहीत?” असे बगळ्याने वारंवार विचारले. “नाही” असे हंसाने प्रत्युत्तर दिल्यावर बगळा मोठ्याने हसला आणि त्याने “अरे हंसा, मानससरोवर म्हणजे सुंदर प्रदेश अशी तू खूप प्रशंसा केलीस. परंतु गोगलगायीशिवाय प्रदेशाचे काय सौंदर्य? तू अजाणतेने तिथल्या वस्तू श्रेष्ठ असे बडबडतो आहेस” असे म्हणून त्याची निंदा केली.
तात्पर्य – लोक स्वतःची इच्छित वस्तू कमी दर्जाची असली तरी मौल्यवान समजतात व स्वतःला न मिळणारी, उपयुक्त नसणारी वस्तू मौल्यवान असली तरी क्षुद्र समजतात.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी