सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ जैसी करणी वैसी भरणी – भाग-3 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
माधुरीताईचे लग्न झाल्यावर हे दोघे बाप लेकच घरांत. अण्णा सकाळी उठून पाणी भरुन, आंघोळ, पूजा, अर्चा आटपून मन्यादादा उठायच्या आंत एखाद्या गृहिणी ला लाजवेल असा स्वयंपाक करुन दोघांचे डबे भरायचे. मग ह्या महाशयांना उठवून त्यांची तयारी. करुन ऑफिस वेळेवर गाठायचे. वक्तशीर, एकदम कडक शिस्तीचे.घर पण व्यवस्थित टापटीप. जिकडची वस्तू तिकडेच पाहिजे. अंधारात सुध्दा ती वस्तू सांपडली पाहिजे.संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर मन्यासाठीं ताजी भाकरी करून द्यायचे.आईवेगळा पोर म्हणून लाड करायचे. आणि मन्या फक्त अभ्यास कर. अवांतर वाचन कर.मित्रांना जमवून टाईमपास कर.कामाच्या बाबतीत इकडची काडी तिकडे करीत नसे.मन्या बोलघेवडा,बोलबच्चन.मित्रांबरोबर ह्याची मस्करी कर, त्याची टवाळी कर. कोणाच्या weak point वर हसून मित्रांचा आणि आपला time pass कर. तसा कोणाच्याही मदतीला साहेब तयार. पण त्याचाही हिशेब ठेवायला आणि वेळ प्रसंगी वसूल करायला विसरत नसे. एकदम calculative.
झालं. मन्यादादाचं लग्न झालं आम्हाला आग्रहाचे आमंत्रण होते. पुण्याला आम्ही गेलो होतो. बायको पण छान त्याला साजेशीच होती. अण्णा खूष. आता त्यांची घरातल्या इतक्या वर्षाच्या रामरगाडयातून सुटका होणार होती. म्हणून तर त्यानी नोकरीवाली मुलगी सून न करता गृहकर्तव्यदक्ष केली. अण्णा फणसासारखे बाहेरुन शिस्तीचे कडक पण आतून प्रेमळ. सुनेला अगदी मुलीप्रमाणे त्यानी वागवले. पण आईची खास शिकवणी असलेली सुन त्यांच्या वरचढ निघाली. वाटेल त्यावेळी माहेरची मंडळी येऊन रहायची. अण्णाच्या शिस्तीची आणि टापटीप पणाची वाट लावायची. आणि स्वतःच्या घरांत अण्णाच परके. त्याना वेळेवर चहापाणी नाही कि जेवण नाही. तेव्हा हा मन्या पण नंदीबैल तिचा. हळूहळू अण्णाचे वय व्हायला लागले त्यानी आयुष्यभर काटकसर करुन भरपूर सच्ची कमाई करुन ठेवलेली त्याच्यावर तिचा हक्क. माधुरीताईला काय देतील? यावर लक्ष.पण अण्णाचे करताना कर्तव्याला मागे. बाहेरगावी सगळे फिरुन यायचे आठ, आठ दिवस आणि अण्णा बिच्चारे एकटे घरी. आता त्याना स्वयंपाक करायचा पण कंटाळा यायचा.झेपत नव्हते. मग चहापाव, वडापाव, फळे खाऊन ते आठ दिवस काढायचे एकटे बिच्चारे. तेव्हा कधी मन्यादादाला आपल्या सारख्या आईवेगळ्या मुलाला आयुष्यभर आईबाप दोघांची भूमिका एकट्यानी बजावून मोठे केले याचा विसर पडला. अण्णांनी कधी तरुणपणात स्वतः चा विचार केला नाही. कधी मित्र नाही का सिनेमा, नाटक नाही. मी आणि माझी मुलं. आणि एकाच घरात राहून म्हातारपणी असं एकटेपणं.
पण आता मन्यादादा, आयुष्यभर हुशा-या करणारा लोकांना बोधामृत, पाजणारा, प्रवचन देणारा, मी शहाणा बायकोच्या नंतर मुलांना शिकवलं. त्यांची लग्न केली. जग जिंकले. पण आज तो एकटा पडला अगदी त्या वेळी भरल्या घरांत एकटे पडलेले अण्णा आठवले.
बिच्चारे.
! जैसी करणी वैसी भरणी!
समाप्त
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈