सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

असं म्हणतात कि, पूर्वी `यमन’ रागाचं नाव `एमन’ असं होतं… ज्याची फोड केली असता ‘ए, मन’ असं असल्याचं जाणवेल… म्हणजे स्वत:च्याच मनाशी साधलेला संवाद! पुढे `एमन’ ह्या शब्दाचा अपभ्रंश होत `यमन’ असं नाव रूढ झालं. हा जो काही एकत्रित स्वरसमूह आहे त्यातून स्वत:च्याच मनाशी होणाऱ्या संवादाचा प्रत्येक भावरंग उत्तमप्रकारे प्रकट होतोच, ही किमया संगीतज्ञांनी अनुभवली असेल आणि म्हणून ह्या स्वरसमूहालाच त्यांनी `एमन’ असं नांव दिलं असावं. मराठीत ‘अरे मना’ असा ‘ए,मन’चा अर्थ होईल. म्हणजे आपल्या मनाला उद्देशून काही सांगणं.

ज्यावेळी भावनेचा एखादा रंग आपण पराकोटीच्या पातळीवर अनुभवतो तेव्हांच आपण अंतर्मुख होतो, स्वत:च्या मनाशी संवाद साधतो. हा संवाद नेमकेपणी साधला जाण्यासाठी प्रत्येकवेळी ‘एमन’च्या/यमनच्या सुरांची आळवणी उपयुक्त ठरते ही अनुभूती सूरसाधकांनी घेतली असेल म्हणून रागालाच म्हटलंय ‘ए, मन’… केवढा सार्थ विचार! काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो कि, यमन असा अपभ्रंश होण्यापूर्वी त्याचं नांव ‘इमन’ असं होतं. ‘इमन’चा अर्थ पाहायला गेलो तरी ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ असा होईल… इथे दोन प्रकारे विचार करता येईल. ‘इ मन’… म्हणजे पुन्हा ‘अरे मना’ असं मनाला उद्देशून किंवा ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ म्हणजे समोरच्याला जणू सांगणं आत्ता ह्या सुरांतून जे प्रकट होतंय हे माझं मनच आहे… जणू माझं अख्खं मन इथं उतरलं आहे ह्याअर्थी!

ह्या अर्थाचा विचार करताना एक निश्चित जाणवेल कि मनाची अवस्था नेमकेपणी व्यक्त करणारे ते यमनचे सूर आणि म्हणूनच नवरसांपैकी कोणताही भाव यमनच्या सुरांतून उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतो. याआधीही आपण पाहिलं आहे कि, एखाद्या रागाची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं जातं तर एखाद्याची चंचल! मात्र यमनचे सूर भावाभिव्यक्तीच्या दृष्टीनं कोणतीही चौकट आपल्याभोवती आखून घेत नाहीत. काहीवेळा, एखाद्या रागाला तो अमुक प्रकारचा रस उत्पन्न करतो असं म्हणणं खूप सापेक्ष वाटतं. बंदिशीतलं साहित्य, त्याचा अर्थ, त्याच्या स्वररचनेची ठेवण आणि रागप्रकटीकरण करत असतानाची कलाकाराची मनोवस्था ह्या सर्वच गोष्टी कलाकृतीतून होणाऱ्या रसोत्पत्तीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळं काहीवेळा रूढार्थानं केलेलं विधान सार्थ ठरतही नाही.

मात्र ह्याहीवेळी पुन्हा एका मुद्द्यावर येईन कि, मानवाच्या जाणिवा अत्यंत सूक्ष्म रूपातही जागृत असताना प्रयोग करून मांडल्या गेलेल्या मतांना काहीतरी अर्थ नक्कीच असणार. त्यांचा अनमान करायला मन धजत नाही. कदाचित रागाकडे अत्यंत सूक्षमतेनं पाहाण्याचा आवाका असणाऱ्यांना हे अर्थ जास्त नेमकेपणी उमजत असतीलही. माझ्यासारख्या सामान्य कलाकारालाही ढोबळमानानं काही अनुभूती येत असतेच. पण क्वचित कधी दुसऱ्या मताचाही विचार करावा का? असं वाटणारेही क्षण येतातच. मनात येतं, इथं कदाचित रागाच्या अंतरंग आणि बाह्यरंगाची गफलतही आपल्याकडूनच होत असावी. असो, पण यमनच्या बाबतीत मात्र हे द्वंद्व उरत नाही ह्याचं कारण म्हणजे त्याचं सर्वसमावेशक असणं!

ह्याच रागाचं नाव कल्याण असंही आहे आणि म्हणूनच हा कल्याणथाटाचा जनकराग आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या रागाचं नांव एकतर यमन म्हणावं किंवा कल्याण म्हणावं. मात्र ‘यमनकल्याण’ नावाचा राग मात्र नुसत्या ‘यमन’ किंवा ‘कल्याण’ रागापेक्षा वेगळा आहे. मागे पाहिल्यानुसार कल्याण थाटाचे स्वर म्हणजे म तीव्र आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध ह्या रागातही तसेच आहेत. नि रे ग म(तीव्र) ध नि सां असा आरोह तर सां नि ध प म(तीव्र) ग रे सा असा रागाचा अवरोह आहे. उत्तमप्रकारे यमन आळवणाऱ्या कलाकाराने उभ्या केलेल्या रागरूपात ‘ग’ आणि ‘नि’ ह्या त्याच्या वादी-संवादी स्वरांचं चिंब ओलेतं रुपडं अगदी खुलून दिसतं… म्हणजे त्याक्षणी रागातून जी रसोत्पत्ती होत असेल त्यात हे सूर अगदी चिंब भिजून जास्त जास्त खुलून आलेले जाणवतात. अर्थातच त्यांना गुंफत राहाणाऱ्या बाकीच्या स्वराचं त्यांना पोषक असणंही महत्वाचं! रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या ह्या रागाचे आरोह-अवरोह पाहाता रागाची जाती षाडव-संपूर्ण असल्याचं लक्षात येईल.

‘प्रभाती सूर नभी रंगती’ सारखी रचना असेल, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहाणे’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’ ‘पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती’, ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’, ‘राधाधरमधुमिलिंद जयजय’ किंवा ‘समाधिसाधन संजीवन नाम’ सारख्या भक्तिरसातल्या रचना असोत, ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम’ सारखे जीवनातली सत्य अधोरेखित करणारे शब्द असोत, ‘कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना’, ‘का रे दुरावा का रे अबोला’, ‘भय इथेल संपत नाही’ ‘लागे हृदयी हुरहुर’ सारख्या काळजाची हुरहुर व्यक्त करणाऱ्या रचना असोत, ‘एकला नयनाला विषय तो झाला’, ‘नाथ हा मोही खला’, ‘सुकांत चंद्रानना पातली’ सारखी प्रसंगाला साजेशी नाट्यपदं असोत, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘जीवनात ही घडी अशीच राहुदे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ सारखे प्रीतभावनेने ओथंबलेले शब्द असोत किंवा ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ ही रांगड्या बाजाची लावणी असो… ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा भावरंग यमनने केवळ आपल्या अनुपम सौंदर्याने खुलवला नाही तर त्याला पुरेपूर न्यायही दिला आहे.

अर्थातच काही रचनांमधे किंचित इतर सुरांचा वापर आणि पुढे कदाचित एखादं पूर्ण वेगळं वळण असू शकणं हे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात सामावून जाणारं आहे. तर, मनाचा प्रत्येक रंग चपखलपणे उलगडून दाखवणाऱ्या यमनचा आवाका मानवी मनासारखाच प्रचंड व्यापक आणि अथांग आहे.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments