सौ. दीपा नारायण पुजारी
☆ जीवनरंग ☆ दृष्टिकोन ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
सुनेत्रा आपल्या स्वत:च्याच फोटो कडे उदास पणे बघत होती. अगदी अलिकडचा ३-४ महिन्यापूर्वीचा भावाच्या नातवाचा वाढदिवस व आईचे सहस्रचंद्रदर्शन या निमित्ताने काढलेले फोटो ! प्रत्येक फोटोत तिचा चेहरा हसरा होता.पण तिला तो निस्तेज वाटत होता. डावा डोळा थोडा बारीकच दिसतो अलिकडे. पाच सहा वर्षांपूर्वी डोळे आले होते तिचे. infection फारच severe.बरे व्हायला महिन्या पेक्षा जास्त दिवस गेले. डोळे बरे झाले. पण डाव्या डोळ्याची पापणी अर्धवट झुकलेलीच असे. Eye ptosis— असे निदान झाले. सुदैवानं कोणताही मोठा दोष नव्हता.परंतु डोळा बारीकच राहिला.
सगळ्यांनी लहानपणापासून केलेले काैतुक आठवत ती फोटो बघत राहिली.मोठे टपोरे असूनही तिचे डोळे शांत होते. आश्वासक नजरेने ती सर्वांना आपलेसे करत असे.एव्हढंच कशाला लग्न ठरले तेंव्हादेखील तिचे डोळे बघुनच पसंती आली होती की ! आज मात्र बारीक झालेला डोळा चेहर्याला sick look देत होता.
हातातला फोटो बाजूला ठेऊन ती उठली. बसून चालणार नव्हते.आज लेकाची पावभाजीची ऑर्डर होती.तो कॉलेज मधून येईपर्यंत सगळं तयार हवं.! पण ब्रेड व बटर दिसत नाहीय घरात. म्हणजे मार्केट मध्ये जायला हवे. जवळच्याच कॉलनीतल्या सुपर शॉपीत तर जायचे.तिने फक्त ओढणी व पर्स घेतली.पण जाताजाता वर पिनअप केलेले केस सोडून पॉनिटेलचा शेपटा मोकळा केला.मन पुन्हा भूतकाळात गेले.आपले केस कधी क्लचर मध्ये बांधता येतील असे तिला वाटत नसे. पूर्वी जाडजूड लांब सडक शेपटा पाठीवर कंबरेच्या खालपर्यंत रुळत असे.तो इतकासा कसा व केंव्हा झाला ? ती पुन्हा उदास झाली.
मान झटकून तिने हातात कुलुप घेतले व चप्पल पायात अडकवले. ऊजव्या पायाच्या अंगठयाचे बोट गेल्या वर्षी मोडले होते.प्लॅस्टर वगैरे उपचार झाले पण ते वाकडेच राहिले. त्यामुळे तिला पायात चप्पलही काळजीपूर्वक सरकवावे लागे.
काय हे ?किती गबाळ्या,कुरुप,विचित्र दिसतोय आपण.आपल्या कॉलेजला जाणार्या लेकाला मित्रांच्या बरोबर आपली ओळख करून देताना लाज वाटत असेल. आणी ‘अहो’? त्यांना तरी अलिकडे आपण आवडत असू का ? तसे थोडे टाळतातच ते आपल्याला आताशा ! सुनेत्रा अगदी रडवेली झाली.
मरगळ घालण्यासाठी तिने घरात आल्यावर आशा भोसले ची गाणी ‘कारवा’ वर लावली. छानशी कॉफी करुन घेतली. आता तिचे हात सराईतपणे पावभाजी करण्यात गुंतले. सुगरणी चे हात व मन आनंदाने किचन मध्ये रमले. सर्व आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. दरवाजाची बेल वाजली. तिचा लेक दारात हसतमुखपणे ऊभा होता.सोबत दोन मित्र.तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने मित्रांची ओळख करून दिली.” जाम भूक लागलीय मम्मीडे! आज मेक च्या लॅब मध्ये मेटल ब्लॉक करायचा होता. काय दमलोय यार.” असे म्हणत तो आत आला.”वाव!! काय मस्त वास सुटलाय. वासाने भूक आणखीनच खवळली बघ “.पावभाजीवर तुटुन पडत सगळ्यांनी तिला दाद दिली. “आई तुझ्या हातात जादू आहे बघ.”
त्याचे मित्र गेल्या वर ती हॉल मधला व ओट्यावरचा पसारा आवरत होती. तो ही मित्रांच्या व कॉलेज च्या गप्पा मारत तिला मदत करु लागला. तसे त्याच्या कॉलेज मध्ये न जाताही तिला सगळे ठाऊक होते. तोच सांगे सर्व. आला घरी की टकळी सुरुच.
आवराआवर होईपर्यंत ‘अहोंचे’आगमन झालेच. प्रथम चहा,गप्पा,TV, बातम्या,जेवण ———–जेवताना बापलेक पावभाजी ची स्तुती करत होते तोंडभरून.”अग आज ऑफिसधला तो जोश्या—- ” असे ऑफिस गप्पांचे तोंडीलावण होतेच.” तू दोन दिवस भिशी ग्रुप बरोबर जाणार आहेस ना ग महाबळेश्वरला ?दोन दिवस हॉटेल मधले बेचव खावे लागणार. क्या करे? बाबा आत्ताच पोटभर खाऊन घ्या “. अशा थट्टामस्करीत जेवणं झाली.
किचन मधील झाकापाकी करून ती बेडरुम मध्ये आली. नवरोबा केंव्हाच झोपी गेले होते. ते्व्हढ्यात तिला मोगऱ्याचा दरवळ आला. अहोंनी ऑफिस मधून येताना मोगऱ्याचा गजरा आठवणीने आणला होता. तो ओंजळीत धरून तिने हुंगला. आणी मनावर दिवसभर आलेली मरगळ कुठच्या कुठे पळाली. विरळ झालेले लहान केस,वाकडे बोट किंवा अशक्त झालेला डोळा यांनी तिच्या प्रियजनांत काहीच फरक पडत नाही. ती सगळ्यांना अजूनही तितकीच आवडते.
बोट वाकडे झाले तरी त्यात चप्पल अडकवता येते. तिला कोणाच्याही मदतीशिवाय चालता येते.! डोळा बारीक झालाय पण दृष्टी चांगली आहे.!! विरळ केसातही गजरा चंद्रकोरी सारखा सजतोच ना!!!
छोट्या छोट्या कृतींमधून घरातल्यांच्या भावना तिच्या पर्यंत पोचल्या होत्या. शब्दांपलीकडले खूपसे तिला उमगले. दोघांचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिला सुखावून गेला. चेहरा आत्मविश्वासाने तेजाळला. ऊशीजवळ मोगऱ्याचा गजरा ठेऊन ती हलकेच निद्रादेवीच्या आधीन झाली.
© सौ. दीपा नारायण पुजारी
१२/५/२०२०
फोन.नं ९६६५६६९१४८
email :[email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈