सौ ज्योती विलास जोशी
☆ जीवनरंग ☆ विविधा☆ सौ ज्योती विलास जोशी☆
‘प्राजक्त’ या माझ्या बंगल्याच्या कोपऱ्यावर एक मुलगा गजरे घेऊन नेहमीच उभा असतो. मी फुल वेडी,नित्य नेमाने त्याच्याकडून गजरा घेऊन माझ्या वेणीत माळते.
दररोज दुपारची साडेतीनची माझी भजनाची ची वेळ! आदले दिवशी घेतलेला गजरा मी वेणीत माळलेला असे. मी भजनाहून परत येताना निमिष पर गाडी थांबवून उद्यासाठी त्याच्याकडून गजरा घेत असे.
आज मी निघतानाच तो माझ्या गाडीच्या आडवा आला. मी त्याच्याकडून गजरा घेतला. मी परतीच्या वेळी त्याच्याकडून गजरा घेणारच असताना त्याने आत्ता गाडी आडवली असे मी ड्रायव्हरला विचारले. दिवाळीचे पणत्या आकाश कंदील करायला तो जाणार होता म्हणून त्याने गडबडीने गजरा दिला. असे काहीसे ड्रायव्हरने मला सांगितले.
ड्रायव्हर त्याच्याशी काहीच बोलताना मला दिसला नाही. मग हे मूक रहस्य काय होते? मला जाणून घ्यायचं होतं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला.ते खरोखरच मूक रहस्य होतं तो मुका आणि बहिरा होता. ड्रायव्हर आणि त्याच्यात फक्त मौन संभाषण.
प्रत्यक्ष मी गाडीतून उतरून गजरा घेत नसल्यानं मला हे कधीच समजलं नव्हतं.
बऱ्याच दिवसानंतर कॉर्नरवर त्याच्यासोबत एक सावळी मुलगी हातात गजरे घेऊन उभी राहिलेली दिसली.”वहिनी,ही त्या गजरे वाल्याची बायको बघा” ड्रायव्हरने माहिती पुरवली.
मी आज गाडीतून खाली उतरले. सांकेतिक खुणांनी आपली बायको असल्याचे त्याने मला सांगितले. माझ्याकडे पाहून तिनं स्मितहास्य केलं .”नाव काय तुझं?” मी विचारलं. तिन हाताच्या बोटांनी हरिण केलं….. “सुंदरा” ?????
नाव ओळखल्याचाआनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसला.मूकपणे तिच्या मौनाचं भाषांतर झालं.तिनं लगेच बकुळीचा हार माझ्या हातात दिला आणि भर रस्त्यात ती माझ्या पाया पडली .मी तिला दोन्ही हातानी उचललं आणि अनाहूतपणे मिठी मारली.
तिचा हसरा चेहरा एक हसरा गंध देऊन गेला .त्या गंधाची झुळूक मला स्पर्शुन गेली . तिने दिलेल्या बकुळीचा वास माझ्या श्वासात भरला. सावळीशी ती किती काही बोलून गेली. तिचं मूकंपण मला बोलकं वाटलं. श्रुती आणि वाणी अबोल असलेली ती मला तिच्या मनातल्या तरंगांशी प्रामाणिक वाटली. देवाने तिच्या हातातच सुगंध पसरवायचे काम दिले असेल का ?असा विचार माझ्या मनात आला तिच्या मौनाचा अर्थ मी लावू लागले…….
निसर्गातील किती गोष्टी मौन बाळगून आहेत. जसे तारे ,आकाश, चंद्र ,नक्षत्र ,वृक्षवल्ली इत्यादी….. त्यांच्या मौनाचे रहस्य असे समजून घेता येईल का मला? वृक्षवल्लीशी आपला ‘शब्देविण संवाद’ होतोच ना ?मौन राखून ही निसर्ग निरंतर गतिशील आहेच ना ?स्पीक लिटिल डू मच असं काही सांगत असतील का ते? मूक प्राणी-पक्ष्यां च्या प्रेमा ची परिभाषा आपल्याला समजते ही मूक परिभाषा सारा आसमंत आपल्याला संक्रमित करत असेल का?
अनंतात विलीन झालेल्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली आपल्या भावना पोहोचवते ना? अशा अनेक प्रश्नांचं काहूर माझ्या मनात माजले. बकुळ गंधा सारखं चिरंतन सुवास देईल असं एक तत्त्वज्ञान आज ही अबोली मला देऊन गेली आणि मौनाचे एक मानसिक तप करायचा मी निर्धार केला!!……
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदरा …..हा जोशी ताईंचा लेख फार फार फार आवडला.
त्यांना जे जाणवलं ते त्यांनी शब्दांतून संपूर्ण पोहोचविले आहे .