सुश्री शिल्पा मैंदर्गी
☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 12 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆
सौ.अंजली गोखले
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
माझी एम ए अभ्यासाची घोडदौड सुरु झाली, पण मला एंट्रन्स ची परीक्षा पास झाल्याशिवाय एम ए ला प्रवेश मिळणार नव्हता.. ताईंनी माझी कसून तयारी करून घेतली आणि मी एन्ट्रन्स ही पास झाले.माझ्या मनामध्ये संमिश्र प्रकारच्या भावना होत्या. एका बाजूला उत्सुकता आणि आनंद र दुसर्या बाजूला अभ्यासाची जबाबदारी.एकीकडे आई-बाबांच्या तब्येतीची खूपच काळजी लागून राहिली होती.तसं बघायला गेलं तर ताईंना आणि मला ना हे शिवधनुष्य पेलायचे होतं आणि आम्ही ते यशस्वीपणे पेललही !
नृत्याच्या सुरूवातीच्या दिवसातला आणि आत्ता चा अभ्यास,रियाज यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.आता शारीरिक आणि मानसिक हालचालींच्या माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत भावभावना पोहोचवायच्या होत्या.शारीरिक हालचाली म्हणजे अंग, प्रत्यांग आणि उपांग.अर्थात हात पाय मस्तक ही अंगे,हाताचे पंजे बोटे कोपरे खांदे ही प्रत्यां गेआणि डोळे डोळे पापण्या ओठ, नाक, हनुवटी ही उपांगे.यांच्या हलचाली मधून आणि आणि मनामध्ये उठणाऱ्या भावतरंग यांमधून अभिनय सहज आणि सोप्या माध्यमातून मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा होता.अर्थातच हे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि त्यामध्ये मनाच्या एकाग्रतेची गरज होती.
नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ताई मला स्पर्शाने मुद्रा शिकवत असत.त्याचे एक सांकेतिक भाषा ठरलेली असे. स्पर्शाने मुद्रा जाणून हे मी सहज आत्मसात केले होते आणि ती सवय माझ्या अंगवळणी पडली होती. आता मात्र मला नृत्यातल्या, अभिनयाचे कौशल्य, त्यातली खुबी अधिक सफाईदारपणे प्रेक्षकांच्या मनावर बिंबेलअशा पद्धतीने मांडायची होती आणि तीही संगीताचा आधार घेऊन.कारण नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एखादी शेजारी उभी असणारी व्यक्ती मला दोन हात बाजूला करून, नुसते बोट दाखवूनही दाखवता येत असे. पण आता मात्र या दोन्ही बरोबर मान आणि नजर त्या बाजूला चेहऱ्यावरील हावभाव सहित प्रेक्षकांना ती दाखवायची होती. माझ्या बाबतीत नजर हा मुद्दा नव्हताच मुळी. फोन मला परीक्षक आणि प्रेक्षक यांना ही गोष्ट अजिबात जाणवू न देता माझी कला, नृत्य सादर करायचे होते. त्यातही मी बाजी मारली.
माझ्या या अभ्यासाला मला सर्वात जास्त आवडलेली रचना म्हणजे अभिनयावर आधारित असलेले “कृष्णा नी बेगनी बारू” (कन्नड – अर्थ – कृष्णा तू माझ्याकडे ये.) या रचनेमध्ये मला यशोदेच्या मनातील भाव, मातृत्वाच्या भावभावना, बालकृष्णाच्या अवखळ लीलाअभिनयातून रंगवायच्या होत्या. यात बालकृष्ण रुसलेला आहे आणि त्याला मनविण्यासाठी यशोदा माता कधी लोण्याचा गोळा दाखवते तर कधी झेंडू खेळायला बोलावते. तर बाल कृष्ण तिला आपल्या अवखळपणानी
सतावतो आणि शेवटी त्याच्याच मुखात तिला म्हणजे मातेला विश्वदर्शन ही घडवतो. या दोन्ही भावभावना वेगळेपणाने दाखवणे ही माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. मी ती नृत्यामध्ये रंगून जाऊन, तन मन अर्पून केली आणि त्या अभिनयासाठी फक्त परिक्षकानीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली.
…. क्रमशः
© सुश्री शिल्पा मैंदर्गी
दूरभाष ०२३३ २२२५२७५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈