सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-2 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆
दयानंदांनी वेदांचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना सर्वांनाच आहे, हे वेदांच्या सहाय्यानं समजावून दिलं.त्यामुळं घडलेली क्रांती मोठी होती.वेदच नव्हेत तर आधुनिक शिक्षणही स्त्रियांना देण्यात ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्यावर दयानंदांच्या विचारांचा परिणाम होत होता किंवा त्यांना यामुळे अधिकृतपणे धर्माचा पाठिंबा मिळाला.स्त्रीशिक्षण,जातिनिरपेक्षता हे धर्माविरुद्ध आहे असं म्हणणाऱ्या सनातनी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळालं.
आज व्यवसाय म्हणून पौरोहित्याचा मार्ग स्त्रियांना खुला झाला आहे यामागे दयानंदांचं खूप मोठं योगदान आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कधीच प्रसिद्ध न झालेला पैलू म्हणजे भारतात घड्याळाचा कारखाना काढता येईल का,यासाठी त्यांनी विचार व पत्रव्यवहार केला होता.आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी असावा हा यामागचा विचार! अर्थात तो अयशस्वी झाला.
तरी भारत “राष्ट्र”म्हणून उदयाला यावा ही त्यांची धडपड होती.
परकीय आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या प्रांतात विशेषतः पंजाब,हरियाणात आर्य समाज रुजला कारण मूर्तीपूजा,त्याचा थाटमाट,मंदिरांचे ऐश्वर्य यासाठी त्यांच्याकडे स्वस्थता आणि सुरक्षितता नव्हती.त्यामानाने स्वस्थ, सुरक्षित दक्षिणेकडील प्रांतात आर्य समाज रुजला नाही.पण आजही आर्य समाजाचं काम चालू आहे.
दयानंदांवर माउंट अबू इथे विषप्रयोग झाला.त्यांना वैद्यकीय मदत लवकर मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती.तो कुणी केला, याबद्दल मतभेद आहेत.त्यांच्या कार्यामुळे हिंदू सनातनी, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मप्रसारक, ब्रिटिश सरकार, काही विलासी संस्थानिक या सर्वांच्याच हिताला बाधा येत होती.पण एक नक्की…..
भारतातील अनेक पुरोगामी,देशहितकारी विचारांवर दयानंदांच्या विचारांची छाया आहे.प्रगतीच्या शिडीतील ही एक विस्मरणात गेलेली महत्त्वाची पायरी आहे,हे विसरता येणार नाही.
© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे
मो – 7499729209
(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈