सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-1 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
ब-याच वर्षानंतर मनात बालपणीच्या आठवणी रुंजी घालू लागल्या. विचार केला लिहून काढू. लिहिता लिहिता सगळा खजिना हाताशी लागला. आठवणींनी शब्दांचं रूप घेतलं, ” खजिना” खुल जा सिम सिम म्हणून अवतरला.
खजिना – 1
रात्रीची जेवणे झाली. आई स्वयंपाक घरातली आवरा आवर करून येईपर्यंत आम्ही दुस-या दिवशीची दप्तरे भरून, शाळेचे युनिफाॅर्म वगैरे ची तयारी करून अंथरूणे घालायचो. आणि मग आमच्या टिवल्या बावल्या चालायच्या. तोपर्यंत बाबा पण दुस-या दिवशीची कामाची तयारी करणे, डायरीत हिशेब नोंद करणे अशी कामे आटोपून घ्यायचे.
आई आली की आम्ही आपापली अंथरूण पटकावायचो. पुढचा एक तास हा फक्त कथा श्रवणाचा असे. रोज रात्री बाबा पु.ल.देशपांडे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील यांच्या कथा, व्यक्तीचित्रे वाचून दाखवत.
मुळात लेखक नावाजलेले, लेखन दमदार, त्यात बाबांचं वाचन म्हणजे ऐकणा-याला निखळ आनंद मिळत असे. पु.लंची अनेक व्यक्तीचित्रे, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली, पूर्वरंग, अपूर्वाई अशी प्रवासवर्णने आम्ही बाबांच्या बरोबर स्वतः अनुभवली आहेत. शंकर पाटलांच्या ग्रामीण कथेतील उसाचा हिरवागार मळा, गार गोड पाण्याची विहीर, त्यावरची मोट, तिचा कुई कुई आवाज, पखालीतलं पाणी पाटात पडल्यावर वहाणारा खळाळता झरा, हे सर्व बाबांच्या अस्सल ग्रामीण वाचन शैलीतून अनुभवलं आहे.
वर्णनात्मक उतारे वाचताना ते कंटाळवाणं कधीच वाटत नसे.कारण वाचनाच्या चढ-उतारा तून प्रत्येक शब्द आणि वाक्य जिवंत होत असे. वाचताना मध्येच आलेले संवाद सुरू करण्यापूर्वी बाबा एक pause घ्यायचे. त्यामुळे नकळत संवादाची चाहूल लागायची. आणि गोष्टी ची लज्जत वाढायची. गोष्ट संपता संपता आम्ही चौघेही निद्रादेवी च्या पांघरूणात गुडुप झोपी गेलेलो असायचो.
अशा अनेक पुस्तकांचं सामूहिक वाचन आम्ही केले आहे. वाचनाचे संस्कार नकळत आमच्यात रुजले. पुढे मुलांना गोष्ट वाचून दाखवताना ही आठवण झाली. आणि जाणवलं, माझंही वाचन बाबांसारखंच होतंय की.. त्यांच्या इतकं छान नाही जमत पण मला वाचताना आणि मुलांना ऐकताना आनंद मिळतोय, तो काय कमी आहे?
स्पष्ट उच्चार, ठणठणीत आवाज, शब्दांची अर्थपूर्ण पेशकश, पल्लेदार वाक्ये, बोली भाषेतला गोडवा आणि हे सर्व सादर करणारी बाबांची रसाळ वाणी.
जिभेवर ओघवत्या सरस्वतीचं स्थान, डोळ्यात श्री गणेशाचे आश्वासक भान, प्रसंग आणि व्यक्तिरेखा सजीव करणारे बाबांचे वाचन या सर्वांचा मिलाफ म्हणजे आनंदाचे सुख- निधान!
क्रमशः…
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈