सौ.अस्मिता इनामदार
☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆
छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.
दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.
“नाही” डॉक्टरांनी सांगितले.
“दुसरा काही मार्ग?”
“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”
“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.
क्रमशः…
संग्राहक – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈