श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 81 ☆
☆ लाटांचा या डोंगर ☆
अथांग सागर गर्जत आला भेटायाला
गाज सोडुनी दुसरे काही कुठे बोलला
आवाजाने धडकी भरली हृदयी माझ्या
बघता बघता लाटांचा या डोंगर झाला
चक्रीवादळ त्याचे होते तो भिरभिरतो
हात कुणाचा हाती घेउन गरगर फिरतो
पाचोळ्याची अशी दशा ही केली त्याने
चक्कर आली निपचित पडला होता पाला
तांडव करते क्षणभर आणिक ही कोसळते
दिसेल त्याचे जागेवरती भस्मच करते
कोण ढकलतो आकाशातुन दामिनीस या
सापडला जो तावडीत तो कुठे वाचला
धरतीने या आज नव्याने कात टाकली
वसंत येता फळा फुलांनी धरती फुलली
प्रवास खडतर आणि दूरचा आहे तरिही
भेटो सागर म्हणुनी शिरला नदीत नाला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈