सौ. सुनिता गद्रे

☆ जीवन रंग ☆ जिंदगी के साथ (भाग-3) ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“थांबा, पोलिसात फोन केलाय. ते येतीलच एवढ्यात.” रिसेप्शनिस्ट म्हणाली. “मॅडम” घड्याळाकडे पाहत बेला म्हणाली. “माझी बेबी शाळेतनं  यायचीय. मला जरा लवकर..!” “नाही, सगळ्या फॉर्मलिटीज पूर्ण व्हायला पाहिजेत” रिसेप्शनिस्टचे उत्तर होते. ‘आलिया भोगासी’… वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. बेलानं शाळेत आणि वडिलांना फोन करून चारूची व्यवस्था केली. किरणनं पण प्रकाश ला फोनवर घडलेलं अघटित  सांगितलं. बेलानं सुदेशला मेसेज टाकला. थोड्या वेळाने पोलीस येऊन धडकले. ”बेला, काय बोलायचं, सांगायचं ते काम तूच कर बाई. मला तर धडकीच भरलीय. उगीच त-त प-प व्हायचं” किरण बेलाचा हात घट्ट धरून म्हणाली.

‘तुम्ही इथं कशा काय आलात ?” पोलिसांच्या प्रश्नावर घाबरून बेला उत्तरली

“रिक्षानं.”

पोलीस दादा हसले. म्हणाले, ”घाबरू नका. तसं नव्हे का आलात?”

“ही पेशंट आमच्या शेजारणीची सून, तिनं पॉयझन घेतलं.  आत्ता घरात म्हाताऱ्या अधू सासु शिवाय कोणी नाही… त्यामुळे शेजारधर्म म्हणून.. बेलानं जरा चाचरत उत्तर दिलं.

मग चौकशीला सुरुवात झाली,

“पेशंटचे नाव?” पोलीस. “समीधा शहा” बेला.

“तुमची नावं?” पोलिस.

“बेला प्रधान, किरण कदम.”दोघी.

“त्यांच्या घरात काही भांडणं?” पोलीस.

“नाही सर,तसं कधी नाही वाटलं.” बेला.

“तसं म्हणजे कसं?” पुढचा प्रश्न.

“म्हणजे विष पिण्यासारखं, किरकोळ भांडणं तर प्रत्येक घरात होतच असतात” बेला जरा सावधानपूर्वक उत्तर देऊ लागली.

“बरं हुंड्यावरून छळ ?” पोलीस।.

“नाही हो सर, सासरची माणसं फार चांगली आहेत. सासू-सासरे ,नवरा, धाकटा दिर सगळेच” बेला.

“मग सून वाईट आहे ?” पोलीस. ”नाही- नाही,ती पण चांगली आहे.”

“काय भानगड आहे राव!” एक पोलिस दुसऱ्याला म्हणाला, ”सासरची माणसं चांगली…सून चांगली… शेजारीपाजारी चांगले… सगळेच कसे छान.. छान.. तरीही सून विष पिते!” पोलिसांचा उपरोधिक स्वर जाणवत होता.

तिथनं सुटका करून घ्यायच्या हेतूनं दोघी म्हणाल्या, “ सर आम्हाला जेवढी माहिती होती तेवढी सांगितली. आता आम्ही जाऊ?”

“नाही त्यांच्या घरातलं कुणीतरी येईपर्यंत थांबावे लागेल” उत्तर ऐकून दोघेही नाईलाजाने बसून राहिल्या.

दहा एक मिनिटात त्यांना सुदेश दिसला. त्याच्याबरोबर विकास भाई आणि समिधाचा नवरा धीरज पण होते… आणि अपार्टमेंटमध्ये काही लोक पण आले होते.

त्यामुळे दोघींची तेथून सुटका झाली. घरी पोहोचेपर्यंत दोघींनी सुदेशला झालेल्या घटनेची इत्यंभूत माहिती दिली होती.

तारा बेन कॉरिडॉरमधे वाट पाहत उभ्या होत्या. चिमुकली मीनू रडवेली झाली होती. त्यांचा अस्वस्थ चेहरा बघून त्यांनी विचारायच्या आतच बेलानं सांगून टाकलं,

“सकाळपर्यंत शुद्धीवर येईल समिधा. दोन दिवस ऑब्झर्वेशन साठी ठेवतील. काळजी करायचं काही कारण नाही. वेळेवर उपचार सुरू झाले त्यामुळे धोका टळला आहे.”       .        पण तारा बेन पॅनिक झाल्या. स्वतःला थोबाडीत मारुन घेत भिंतीवर डोकं आपटून लागल्या. “डाळ फार पातळ करते… भाजीत मसाला कमी असतो म्हणून जरा सांगायला गेले तर हा प्रकार!” त्या हुंदके देत पुढे सांगू लागल्या.

बेला पुढं झाली. त्यांच्या पाठीवरून हात फिरवून धीर देत राहिली.

“येतील थोड्या वेळाने विकासभाई. धीर धरा.। सगळं चांगलंच होणार आहे.” असं म्हणत त्यांना ती त्यांच्या घरी पोहोचवून आली.

क्रमशः …

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments