सौ.अस्मिता इनामदार
☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-2 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆
दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,”उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू.” महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. “गळसाज” असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !
अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, “पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला.” पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले.
महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली.
मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, “पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही.” तेव्हा पिराजी म्हणाला, ” बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल.” पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला.
संग्राहक – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈