☆ जीवनरंग ☆ बोध कथा – विनाशकारी लोभ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
लघु बोध कथा
कथा १६ . विनाशकारी लोभ
अवंती नगरात सुबुद्धी व दुर्बुद्धी नावाचे दोन व्यापारी होते. त्या दोघांनी दुसऱ्या देशात जाऊन भरपूर धन प्राप्त केले. तिकडून आल्यानंतर स्वनगराजवळच असलेल्या एका चिंचेच्या झाडाखाली कोणालाही कळू न देता खणून ते धन ठेवले व स्वगृही परतले. एक दिवस दुर्बुद्धीने एकट्यानेच ते झाडाखाली पुरलेले धन खणून काढले व स्वतःच्या घरी नेऊन ठेवले.
दुसऱ्यावेळी जेव्हा दोघे एकत्र त्या ठिकाणी गेले व त्या वृक्षाखाली खणले, तेव्हा त्यांना ते गुप्तधन मिळाले नाही. तेव्हा दुर्बुद्धीने सुबुद्धीचे मनगट पकडून म्हटले, “तूच इथे लपून येऊन एकट्याने सर्व धन हरण केलेस आणि काही माहिती नाही असे नाटक करून इथे धन खणण्यास आलास. आता माझ्या वाटणीचे धन मला परत दे.” “खरेच मी काहीही जाणत नाही” असे सुबुद्धीने वारंवार शपथेवर सांगून सुद्धा तिकडे दुर्लक्ष करीत दुर्बुद्धीने त्याला न्यायाधीशाकडे नेले आणि त्यांस सांगितले की, “आम्ही दोघांनी एकत्रितपणे खणून ठेवलेले गुप्तधन ह्या सुबुद्धीने एकट्याने पळविले. तेव्हा माझा वाटा ह्याने परत द्यावा”.
न्यायाधीशांनी दुर्बुद्धीला विचारले की, “ तुम्ही दोघांनी मिळून ठेवलेले गुप्तधन सुबुद्धीने एकट्याने घेतले असे तू सांगतोस. याची काही साक्ष तू देऊ शकतोस का?” दुर्बुद्धी उत्तरला, “ ज्या वृक्षाच्या मुळाशी धन ठेवले तोच याची साक्ष देईल.” न्यायाधीश म्हणाले, “ ठीक आहे. उद्या वृक्षाजवळ येऊन विचारूया”.
नंतर दुर्बुद्धीने रात्रीच आपल्या वडिलांना एकांतात नेऊन झाडाच्या ढोलीत लपवले व त्यांना बजावले की, “न्यायाधीशाने झाडाजवळ येऊन जर विचारले तर सुबुद्धीने सर्व धनाचे अपहरण केले असे सांगा”.
ठरल्याप्रमाणे न्यायाधीश सकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर झाडाजवळ आले व ” इथे खणून लपवून ठेवलेले धन कोणी चोरले?” असे त्यांनी विचारले. “ सर्व धन सुबुद्धीने पळविले” असा ढोलीतून आवाज आला. तो आवाज ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले. न्यायाधीशांनी क्षणभर विचार करून त्या ढोलीत थोडे गवत ठेवून ते पेटवून दिले. ढोलीतअसणाऱ्या दुर्बुद्धीच्या वडिलांना अग्नी व धुरामुळे श्वास घेणे अवघड झाले व त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे न्यायाधीशांना दुर्बुद्धीचे कपट लक्षात येऊन, यानेच सर्व धन हरण केले याची खात्री पटली व त्यांनी सगळे धन सुबुद्धीलाच दिले. धननाश व पित्याचा मृत्यू यामुळे खूप दुःखी झालेला दुर्बुद्धी स्वतःला दोष देत घरी परतला.
तात्पर्य – जो दुसऱ्याचा घात करण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्याचा ईश्वरच घात करतो.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी