श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अवलिया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

थंडी वाढत चाललीय. गारठाही. काकडायला होतय. माणसं पशू, पक्षी, प्राणी सगळेच गारठलेत. व्हरांड्यात छोट्या चार वर्षाच्या प्रणवला स्वेटर घालत होते. आमच्या  घरासमोर रेन ट्रीचं झाड आहे. समोर खूप मोकळी जागा आहे. तिथे भोवतीनं अंतरा-अंतरावर रेन ट्रीची झाडं उभी आहेत. खूप लोक त्यांना शिरीषाची झाडं असंही म्हणतात. झाडं खूप मोठी आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी लावलेली असणार. थंडी सुरू झाली  की पानगळ सुरू होते.

स्वेटर घालून घेता घेता, समोरच्या झाडाकडे बघत प्रणव म्हणाला, `आई, ती पानं खाली पडताहेत बघ! म्हणजे झाडांना जास्तच थंडी वाजत असेल ना!’ त्याच्या बोलण्याचं मला हसूच आलं. `खरंच की!’  मी म्हंटलं. पण त्याच्या बोलण्यामुळे माझं लक्ष अभावितपणे समोरच्या झाडाकडे गेलं. एरवी झाड पानांनी अगदी भरगच्च दिसतं. आता मात्र त्याच्या माथ्यावरची हिरवी छत्री विरविरित झालीय. नुसती विरविरितच नाही, तर आता त्या छत्रीला खूपशी भोकंसुद्धा पडलीत. त्या  भोकातून आभाळाची धुरकट निळाई दिसतीय. इतक्यात एक करड्या रंगाचा पक्षी तिथे आला आणि एका फांदीवर बसला. बराच वेळ दिसत राहिला. एरवी झाडांच्या गच्च गर्दीत छान छपून राहतो तो. आज मात्र तो माझ्या बल्कनीतून अगदी स्पष्ट दिसतोय. मनात आलं, काय वाटत असेल बरं त्या पक्षाला? आपण आसरा घ्यायला या झाडाच्या घरात आलो खरे, पण त्याने तर आपल्याला लपवून ठेवण्याऐवजी, आपल्या घराच्या भिंतींच्या, पानांच्या वीटाच काढून घेतल्या. आता आपण सहजपणे घास होऊ शकू, एखाद्या शिकारी पक्षाचा, किंवा मग एखाद्या शिकार्‍याच्या मर्मभेदी बाणाचा.

माझं लक्ष पुन्हा तिथल्या झाडांकडे गेलं. सर्वच झाडांची पानगळ होते आहे. तिकडे बघता बघता एकदमच एक गोष्ट जाणवली. एरवी पानांची घनदाट घुमटी सावरत मिरवणारी ही झाडं सगळी एकसारखीच वाटायची. पण आता पानगळीमुळे ही झाडं आकसलीत. आता त्यांच्या आकृत्या, रूप-स्वरूप नीट दिसतय. त्यांच्य रुपाचं वेगळेपण जाणवय. प्रत्येकाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व लक्षात येतय.

झाडांकडे पाहता पाहता, मला एक कविता सुचली. `अवलिया’.

`ओलांडुनिया पाचही पर्वत एक अवलिया आला कोणी भणंग,  भटका, लक्तरलेला, तुटकी झोळी हाती घेऊनी’

हा अवलिया म्हणजे शिशिर ऋतू. पाच ऋतुंचे पाच पर्वत ओलांडून तो या भूमीवर आलाय. आता दोन महिने या भूमीवर त्याचेच साम्राज्य, पण तो सम्राटासारखा कुठे दिसतोय? तो तर दिसतोय भणंग भिकार्‍यासारखा. जीर्ण-शीर्ण, मलीन-उदासीन. त्याची झोळीही विरविरित, फाटकी-तुटकी, धुक्याची. तो थंडी-गारठा घेऊन आलाय. त्याच्या येण्याने जमिनीला भेगा पडल्याहेत. माणसाच्याही हाता-पायांना कात्रे पडलेत. ओठ फुटलेत॰ गाल खडबडीत झालेत. अवघं शरीरच कसं रुक्ष-शुष्क झालय. जमिनीप्रमाणेच.

पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्‍या नद्या आता आटल्या आहेत. आकसल्या आहेत. जणू त्यांच्या थेंबांचे मोती-दाणे त्या फकिराने झोळीत भरून घेतलेत. फुलांच्या पाकळ्या, झाडांची पानेही त्याने ओरबाडून घेतलीत. आपल्या झोळीत टाकलीत. त्यामुळे जमिनीप्रमाणे वृक्षांच्या सावल्याही सुकल्या आहेत. त्याची झोळी भरली. आता तो पुन्हा निघून चाललाय आपल्या देशात. इथे सृष्टी मात्र बापुडवाणी होऊन बसलीय. पण ही स्थिती कायम थोडीच राहणार आहे? फाल्गुन सरता सरता नव्हे, फाल्गून लागता लागताच पुन्हा चमत्कार होणार आहे. त्यावेळी झाडे निष्पर्ण झाली असली, तरी गुलमोहर, पळस, पांगारा, शेवरी आपल्या माथ्यावर रत्नमाणकांची फुले मिरवणार आहेत.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

पत्ता – द्वारा, अमोल केळकर,  सेक्टर-5, सी-5, बिल्डिंग नं. 33, 0-2पंचरत्न असोसिएशन, सी.बी.डी. – नवी मुंबई पिन- 400614

मो. – 9403310170

e- id- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Varsha Wakankar

सुंदर लेख.