सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
चतूर सुजन राग कहत
बागेसरी शास्त्र विहीत
खर हर प्रिय मेल जनित
पंचम अति अल्प गहत…….
समवादी खरज रहत
रात त्रितीय प्रहर रमत
म ध संगत चितको हरत…..
शास्त्रकारांनी केलेले हे बागेश्रीचे वर्णन!
अतिशय मधूर स्वरांची ही रागिणी काफी थाटांतून उत्पन्न झालेली,मध्यम आणि षड् ज वादी व संवादी सूर असून गंधार,धैवत व निषाद कोमल आहेत. आरोहांत पंचम पूर्णपणे वर्ज्य.मप(ध)मप(ग)इतकाच पंचमाचा उपयोग.
आकाशांत पुनवेचा चंद्रमा उगवला आहे,त्याच्या शीतल प्रकाशाने आसमंत न्हाऊन निघाला आहे आणि तुडूंब भरलेल्या सभागृहांत हरीप्रसाद चौरसियांसारख्या दिग्गज कलाकाराने बासरीतून बागेश्रीचे स्वर काढले आहेत,श्रोते देहभान विसरून
म(ध)(नि)सां,(ध)(नि)सां अशा कोमल सुरांच्या वर्षावात चिंब भिजताहेत, हा सोहळा कसा वर्णावा? कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकून विरहाने व्याकूळ झालेल्या राधेची झालेली सैरभैर अवस्था, तिच्या मनांतील शंका कुशंका हेच भाव जणू काही या बागेश्रीतून बोलके झाल्यासारखे वाटतात, आणि “मोहे मनावन आये हो, सगरी रतिया किन सौंतन घर जागे” या पारंपारिक बंदीशीची आठवण येते. जयपूर घराण्याच्या गायकीतून ही विरहावस्था चांगलीच जाणवते.
कुमार गंधर्वांनी याच बागेश्रीच्या सुरांतून वेगळा भावाविष्कार दाखविला. “टेसूल बन फूले रंग छाये, भंवर रस ले फिरत मदभरे”
पळसाचे बन फुलले आहे, भ्रमर फुलांतील मधुसेवनाचा आनंद घेत आहेत, हे सांगणारे निसर्गाचे चित्र त्यांनी ह्या बंदीशीतून रेखाटले.
“फेर आयी मौर मेरे अंबूवापे” ह्या बंदीशीत त्यांनी निसर्गचक्र अविरत फिरतच असते हा भाव दाखविला. याचाच अर्थ असा चैतन्य, समृद्धी ही वातावरण निर्मीति बागेश्रीच्या सुरावटींतून केली.
“जा रे बदरा तू जा” ही प्रभा अत्र्यांची बंदीश मनाला भुरळ पाडणारी आहे. नाजूक भावनांची जपणूक करणार्या बागेश्रीच्या सुरांवर हळुवार मींड हा अलंकार चांगलाच खुलतो.
या रागावर आधारित बरीच नाट्यपदे आणि सुगम भावगीते आपल्या परिचयाची आहेत. सौभद्रातील “बहुत दिन नच भेटलो सुंदरीला” हे बागेश्रीतील गाजलेले पद! तरूण आहे रात्र अजुनी(सुरेश भटांची गझल) आणि(घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा) हा ज्ञानेश्वरांचा अभंग र्हुदयनाथ मंगेशकरांनी बागेश्रीच्या आधारावरच संगीतबद्ध केला. मृदुल करांनी छेडीत तारा, नाम घेता तुझे गोविंद ह्या भक्तीगीतांवरही बागेश्रीचीच छाया आहे. राधा ना बोले ना बोले, आजा रे परदेसी,घडी घडी मेरा दिल धडके, जा जा रे बालमवा ही हिंदी चित्रपटांतील गाजलेली गाणी या बागेश्री रागावर आधारीतच आहेत.
हमे कोई गम नही था (बेगम अख्तर), एक दीवाने को आये है समझाये कही (जगजीत सिंह), चमनमे रंगे बहार उतरा (गुलाम अली) हे गझल आजही रसिकांचे मन लुभावणारे आहेत.
कलाकारांचे व रसिक गणांचे अतिशय प्रेम असलेला हा राग! वागीश्वरी ह्या मूळ शब्दांतून अपभ्रंशित शब्द बागेसरी व त्यानंतर बागेश्री ! सरस्वतीची मधूर, प्रेमळ, भावूक वाणी!
क्रमशः….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
Apratim