☆ कवितेचा उत्सव ☆ छडी वाजे छम छम् ☆ श्री राजेंद्र परांजपे ☆
(भरलेल्या वर्गासमोर उभं राहून शिकवण्याची सवय असलेल्या शिक्षकांना ह्या कोरोनामुळे ऑनलाईन शिकवायची वेळ आली. काही दिवसांपूर्वी केलेल्या ह्या कवितेत त्यांचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.)
नाही फळा तो मागे, नाही खडू हाती !
हे असे शिकवावयाचे अवघड वाटते !
करुन खटपटी, शिकलो जरी नवतंत्र !
परी संगणकाची अजून भीती वाटते !
दाटतो मम मनी तो गलबला मुलांचा !
रोजची तयांची मज मस्तीही भासते !
ते खेळणे तयांचे, दंगा अन् मस्करी !
न पाहू शके ते आज, परी उरी दाटते !
कधी पुन्हा उघडून भरेल मम शाळा ?
हे असे शिकवणे मज नकोसे वाटते !
थांबला असाच तो घंटेचाही ठणाणा !
निःशब्द जाहली ती जरी मनी वाजते !
© श्री राजेंद्र परांजपे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈