सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ अवनीचा लॅपटॉप – भाग – 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
“अवनी s चला,बूट घाल. बाहेर जायचे ना? गाडीच्या किल्ल्या आण बरं”. बाबांनी आपल्या खास शैली मध्ये अवनीला हाक मारली. इतर वेळी गाडीच्या किल्ल्या म्हटल्याबरोबर दुडूदुडू धावत येणारी अवनी आज आली नाही. खिशामध्ये मोबाईल ठेवता ठेवता त्यांनी पुन्हा हाक मारली.” अवनी, आज गंमत आणायचीय ना? येताना आइस्क्रीम खाऊ याह!” आईस्क्रीम चं नाव ऐकलं की अवनी हमखास येणार याची खात्री होती. पण आज अवनी चांगलीच रुसु बाई झाली होती.
आपली पर्स,पिशव्या गोळा करता करता आई नही हाक मारली.” चल अवनी! आज तो नवीन लाल फ्रॉक घालायचं ना? पटकन ये. नाहीतर आम्ही जाऊ ह! घरी एकट बसावं लागेल. अंधार झाला की बागुलबुवा येईल गप्पा मारायला.”
“नाही, नाही, नाही, मी नाही येणार”. इतक्या ठसक्यातला नकार ऐकून सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. काय बिनसलं एवढ्या पिटुकल्या 4 वर्षाच्या अवनीचं? कोणालाच कळेना.
खिडकीचे दार बंद करता करता अवनीच्या बाबांनी आपलं खास अस्त्र काढले.” अवनी चल बर पटकन. आज पाटी आणि रंगीत चित्राचे छान छान पुस्तकही घेऊया. मोठा फुगा आणूया”
सगळ्यांनी इतकी आमिषे दाखवली तरी अवनी आपली हुप्पच. शेवटी लाडक्या नातीला खुलवायला आजी गेली.” अवना, ए अवना, जायचे ना बाहेर? पाडव्याला नवीन शाळेत नाव घालायचे. कशी झोकात जाणाऱ आमची अवना शाळेला. नवीन दप्तर, नवीन पाटी, वा वा!”
गोबऱ्या गोबऱ्या गालांची, गोरी गोरी अवनी आज खूपच रुसली होती. फुगलेल्या दोन्ही गालांवर हाताची मूठ ठेवून आजीकडे रुसु बाई अवनी पाहत होती. “नाही म्हटलं ना, काही नको मला ती पाटी. मला लॅपटॉप – हवाय.”
आबा, आजी, आई, बाबा सगळ्यांनी गरकं न वळून तिकडे पाहिलं. हि च्या रुसव्याच कारण हे आहे तर.
कळायला लागल्यापासून लहानाचे मोठे होताना तिने आपल्या आई बाबांच्या हातात लॅपटॉप पाहिले होते. डोळे घालून दोघंही काम करताना ती रोज पहात होती. दुपारच्या वेळी तिचे आबा कॉम्प्युटरवर पत्त्यांचा डाव खेळत. तेही तिने निरखून पाहिलं होतं. त्यांच्या मांडीवर बसून कॉम्प्युटर चा माउस हाताळायला ती शिकली होती. त्यांच्याशी गोड गोड बोलून कार्टून ची सीडी लावायला तिनं शिकून घेतलं होतं. नुसतं क्लिक केलं, कि छोट्या पडद्यावर तिला तिच्या चुलत बहिणी राधा रमा यांचे फोटो बघता येत होते. ती स्वतः बाळ असल्यापासून चे फोटो रोज पहायचा नादच तिला लागला होता. ती छोटे छोटे बाळ होती तेव्हा आजी पायावर घेऊन तेलानं चोळत होती. भरपूर गरम गरम पाण्याने अंघोळ घालत होती. गुलाबी गुलाबी पफनं पावडर लावत होती. छोटीशी काळी तीट लावत होती. त्यानंतर चे फोटो मात्र नव्हते. “आजी, अंघोळ झाल्यावर काय करायचे ग मी? “दरवेळी अवनीचा आजीला प्रश्न असायचा.” भु डूश्य करून माझी शहाणी अवना झोपून टाकायची. आहेच मुळी शहाणीअव ना”
खरंच छोटा बाळ असल्यापासून अवनी शहाण्यासारखे वागायची. वेळेवर झोपायची, सगळं कसं वेळच्या वेळी.म्हणूनच तर आई लगेच आपला ऑफिस जॉईन करू शकली. दुपारच्यावेळी आजी आणि आबांच्या सहवासात अवनी मोठी होत होती.
क्रमशः…
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈