सौ.अंजली दिलिप गोखले
☆ जीवनरंग ☆ अवनीचा लॅपटॉप – भाग – 3 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
दुसऱ्या दिवशी आजोबांनी सकाळीच लाईटचा मेन स्वीच बंद करून ठेवला आणि आपणहून अवनीशी काहीही बोलायचे नाही असे पक्के ठरवून ठेवले. अर्थातच त्यांना ते जड जात होते. त्यांनाही करमत नव्हते. पण आज हे करायलाच हवे होते.
आजी आणि अवनी दोघींचं आवरण सुरु होतं. अंघोळ झाली, नाश्ता झाला. आज आजोबांनी लवकरच नाश्ता केला. अवनीला त्यांच्या डिशमधले दाणे मिळाले नाहीत. अवनीचं रोजच्या प्रमाणे आजोबां भोवती रुंजी घालणे सुरुहोते. पण आज आजोबांनी पेपरमधून डोकं काही बाहेर काढले नाही. डोळ्यासमोर पेपर धरला होता खरा पण सगळं लक्ष अवनीकडेच
“आजोबा, आज तुम्हाला बरं नाही का?.” अवनीचा निरागस प्रश्न ऐकून आजोबांना कससच झालं. पण अवनीला आज पाटीची गोडी लावायची होती ना!
दुपारी आजी झोपली. आता आजोबा आणि अवनी दोघेच जागे.” आबा, चला ना. कॉम्प्युटर ला वाना. मला कार्टून पहायच य.”
अग, आज लाईट नाहीत.
“मग मी काय करु आता?”
आजोबा उठले. त्यानी काल आणलेली पाटी काढली. आणि आराम खूर्चीत बसून त्यावर चित्र काढायला लागले.” काय आहे ते आजोबा? काय करताय तुम्ही?”
“अग, हा माझा खूप जुना लॅपटॉप आहे. हे बघ, मी बॉल काढला. आता फूल काढतो”
लाईट नसतानाही सुरु होणारा आबांचा लॅपटॉप बघून अवनी आश्चर्यचकीत झाली. डोळे मोठ्ठे करून आबांना चिकटली.” कसं काढता हो आजोबा?”
“कसं म्हणजे काय? ही पांढरी पेन्सिल आहे ना, तो आमचा माऊस. बघ. बोटांनी क्लिक कर तो. हे असं. आला की नाही आंबा? आता परत रबरनं म्हणजे या रुमालानं पुसुया. बघ. गेल सगळं. क्लिक. आता अवनी काढूया. हे अवनीचं डोकं “हा फ्रॉक, हे पाय”. आता डोळे काढाना या अवनीला. आजोबा, मला देता हा लॅपटॉप? मला आवडला. लाईट गेले तरी तुमचा लॅपटॉप चालू राहतो.”
“हे बघ अवनी, तुझा लॅपटॉप. या तुझ्या लॅपटॉपला छानछान रंगीत मणी आहेत. एक दोन तीन असे शिकायला.”
“आहा आजोबा, किती छान. मला द्या माझा लॅपटॉप आणि पांढरा माऊस. मी ऑपरेट करते”.
लाईट गेल्यावरही सुरु होणारा लॅपटॉप अवनीला खूप आवडला.
पांढऱ्या माऊसनं क्लिक करत चित्र काढण्यात अवनी दंग होऊन गेली. आपला प्रयोग यशस्वी झाला म्हणून आजोबाही खूश झाले.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मो 8482939011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈