सौ. सावित्री जगदाळे
☆ मनमंजुषेतून ☆ शेती भाती ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆
आईचं वय झाले आहे. आता शेतीतील कामे होत नव्हती. गुडघे दुखत होतेच. तरी तिचे माळवे लावायचे वेड कमी होत नव्हते. गवार भेंडी, पावटा, मिरच्या, असं लावायची. माळवं निघायला लागले की सुनेच्या मागे पिरपिर , “तेवढ्या गवारीच्या शेंगा तोडून दे पोरांना.”
सुनेने बाकीची कामे सोडून गवारी तोडाव्यात. नाहीतर रोजाच्या बाईला घेऊन माळवं तोडून तालुक्याच्या गावाला पाठवावे. तिथं मुलं शिकायला एक कुटुंब ठेवलेले. शेती करणारा भाऊ म्हणायचा, ” होत नाहीतर कशाला अबदा करून घेतीस? त्यांना पावशेर शेंगा विकत घेणं होईना काय…”
रोजाची बाई लावून भाज्या तोडून पाठवणे त्याला पटत नव्हते आणि परवडत ही नव्हते. पण एवढी मोठी शेती आणि पोरांनी विकतच्या भाज्या खायचे हे आईला पटत नव्हते. ती कोंबड्या पाळायची. अंडी लागतात पोरांना म्हणून. स्वतःच्या गळ्यात माळ असली तरी गावात मटण पडले की घ्यायला लावायची. पाठवून द्यायची.शहरात काहीच चांगले मिळत नाही हा तिचा समज. दूधवाला तर एक ठरवूनच टाकलेला. घरचे दूध रोज पोरांकडे पोच व्हायचे.
कोवळी गवार लोखंडी तव्यावर परतलेली पाहून तिला लेकिंची आठवण यायची. चुलीत भाजलेली वांगी पाहून तिचे डोळे भरायचे. भाजलेली, उकडलेली मक्याची कण सं पाहून जीव तीळ तीळ तुटायचा. हे सगळं पोरांना पोच व्हायलाच पाहिजे हा तिचा अट्टाहास असायचा.
मातीशी असलेलं हे नातं तिच्या आरपार रुजलेले आहे. बाई शेतीशी कशी एकरूप, एकजीव होते हे तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवत राहते. तिला कुठल्याही पाटाचे पाणी पवित्र वाटते. तहान लागली की ती ते पाणी पिते. साचलेले असले तरी. ” त्याला काय व्हत?” हेच तिचे पालुपद. आणि तिला खरेच पाणी बादले आहे असं झाले नाही. ही तिची अतूट श्रद्धा, वावरा शिवाराची एक ताणता जाणवत राहते. पायात चप्पल न घालता शेताच्या सरीतून, बांधातून फिरायचे काटा मोडण्याचे भय तिला कधीच वाटले नाही. शेतातून फिरणारे साप तिला राखणदार वाटतात. त्यांचीही भीती कधी वाटली नाही.
आता नुसतीच मोठी पिकं घेतात. जवसाची मुठ, तिळाची मुठ कुणी पेरत नाही म्हणून ती हळहळत असते. तिळाची पेंढी असली की तेवढीच बडवून, पाखडून गाडग्या मडक्यात भरून ठेवायची.
कधीही माहेरी गेली की ती धडधाकट होती तेव्हा रानात कामे करायची, घरी राहायला लागल्यावर सतत काही तरी निवडणे, पाखडणे चालूच असायचे. कुठल्या ना कुठल्या मडक्यात महत्वाचे ठेवलेले काढून द्यायची. ती उतरंड च आता गायब आहे.
असेच कितीतरी बदल होत राहतील. काळा बरोबर हे होतच राहणार… रानाशिवाराशी एकजीव झालेलं हे जुनं खोड बदल न्याहाळीत राहते. नजर कमकुवत झाली आहे तेही बरेच आहे.
© सौ. सावित्री जगदाळे
१७/२/१९
संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈