सौ. वंदना अशोक हुळबत्ते

☆ जीवनरंग ☆ केअरटेकर – भाग – 2 ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सकाळी लवकर उठून आपले आवरले. स्वत:पुरता नाष्टा करून खाल्ला. आज ऑफिसचा पहिला दिवस होता. पिकअप् करण्यासाठी तिने हा पत्ता ऑफिसला दिला होता.गाडी आली ती गेली. नेहमीच्या सवयी प्रमाणे सम्यक दुपारी उठला अंघोळ आवरुन,  हाॅटेलात जेवून आला. आज घर कसे झकपक होते. प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे. एका बाईच्या हाताची जादू. घराला घरपण लगेच येते. बाई जेवढ्या प्रेमाने घर आवरते तेवढ्या प्रेमाने पुरूषाला जमत नाही.हे मानलं मी. तो स्वत:वर हसला आणि पुन्हा झोपला. विभा संध्याकाळी घरी आली तेव्हा तो नव्हता. हा लपंडाव आहे. हे घर फक्त झोपायला हवं आहे का? तिने निवांत आपले आवरले, पिठलं भात तयार करून खाल्ला. ती झोपली. आज चांगली झोप लागली. याच रूटीन मध्ये आठवडा कसा गेला समजले नाही आज रविवार मी घरात. तो ही घरात. आपण आपले आवरावे आणि

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जावे. या विचारात ती आवरत होती. तो अंघोळीला गेला होता. तेव्हा बेल वाजली. मी का दार उघडू? माझ्या ओळखीचे कोणी नाही. तिने दुर्लक्ष केले. पुन्हा बेल वाजली तो आतून ओरडला दार उघडा. मी दार उघडले तर दोन मुले होती दारात त्यांचे मित्र असावेत मला पाहून ती गडबडली. मला बघून वेगळाच अर्थ काढला

“साॅरी, न.. सांगताच आलो. येतो आम्ही. सम्याला सांग.अज्या, जॅकी आले होते.”

मी काही बोलायच्या आत सम्यक टाॅवेल गुंडाळून बाहेर आला तो दिसताच “लेका…भावा…पार्टी पाहिजे. आम्हाला न सांगता वहिनी आणलीस.”

“ती वहिनी नाही. पेईंग गेस्ट आहे.”

“सम्या आम्ही सकाळी घेत नाही. काही पण पुड्या सोडतोस. अशी कोणी मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहिलं होय.”

ही चर्चा अजून वेगळ्या वळणावर जायच्या आत विभा म्हणाली “होय हे खरे आहे. मी पेईंग गेस्ट म्हणून राहते इथं.”

मित्र घरात आले मी बाहेर पडले. हे गृहित होते. लोक बोलणार. दुसरीकडे घर शोधत राहू चांगले मिळाले की हे घर सोडू. मंदिरात बसून तिने घरी फोन केला. “आई कशी आहेस?”

“मला काय होतंय? तू कशी हायस पोरी. जेवलीस का? तुला हवा मानवली का? जागा मिळाली का? काम कसे आहे? “आई काळजीने चौकशी करत होती. कुशल मंगल विचारत होती. दोघीच्या मायेला पुर आला होता. आईचे आतडे ते लांब गेलेल्या मुलींची काळजी वाटणार.” नवीन शहरात हायस जीवाला जप. तूझ्यावर घर हाय बघ. काही झालं तरी नोकरी महत्त्वाची. तवा जपून रहा. नीट काम कर. सांभाळून रहा.”

“माझी काळजी करू नकोस प्रकाश शाळेत जातो का बघ. त्यांचा अभ्यास घे. बाबांची काळजी घे. फोन ठेवते.” आईशी बोलल्यावर वेगळी ऊर्जा मिळाली. आजवर आईने आपल्यासाठी किती कष्ट उपसले ते आठवले. दिवसरात्र राबून तिने आपल्या शिकवले घर सांभाळले. बाबांचा काही उपयोग नाही. आयुष्यभर कडक इस्त्रीचे कपडे घालून ते पुढारीपणा करत हिंडले. आई होती म्हणून माझे शिक्षण झाले. आता प्रकाशला शिक्षण देण्याची, घर चालवण्याची जबाबदारी माझी आहे. आई नेहमी म्हणायची ‘पोरी तूला चांगली नोकरी लागली की माझी दगदग संपेल बघ. मग प्रकाशची काळजी नाही. तूला कमावलं पाहिजे. तू घराची काळजी घेतली पाहिजे. तुझ्या जीवावर आहे आता सगळं घर.’

विभा ऑफिस मधून घरी आली तर सम्यक घरीच झोपून होता. तिने हाक मारली तरी तो उठला नाही. जवळ जावून पाहिले तर तो कन्हत होता. त्याच्या अंगात ताप असणार. आपण चौकशी केली तर आपण करार मोडला जाणार, आपल्या घर खाली करावे लागणार. काय करू? तिने पुन्हा हाक मारून उठवले तसा तो उठला. तिने चहा बिस्किटे दिली त्याला थोडी हुशारी आली. समोर उभे राहून दवाखान्यात पाठवले औषध खायला घातले. रात्री त्याच्यासाठी मऊ खिचडी केली दोन तीन दिवस चांगली देखभाल केली त्यांच्यात सुधारणा झाली.

“मी हे घर कधी सोडू?”

या प्रश्नाने तो गोंधळला “का?”

“मी आपण आजारी असताना तुमच्या जीवनात ढवळाढवळ केली. करार मोडला, नियमानुसार मला गेले पाहिजे.”

“ही…. ढवळाढवळ चांगली होती. यासाठी घर सोडायची गरज नाही. ती माणुसकी होती. तुमचा मला काही त्रास नाही. तुम्ही राहू शकता.”

“मग मी काही विचारलं तर चालेल. करार मोडणार नाही ना.”

“मी काल इथं एक कागद पाहिला तुम्ही तर डिग्री होल्डर दिसता. मग हे काम?”

“ती मोठी कहाणी आहे. संकट येतात तेव्हा एकटी येत नाहीत. काही वेळा जगण्याची उमेद संपवतात. दोन तीन वर्षांपूर्वी एका अपघातात माझे आई-वडील दोघे गेले. क्षणात मी पोरका झालो. आमचे कुटुंब मध्यप्रदेश मधील वडील एकूलतेएक तिकडे ही कोणी नातेवाईक नव्हते मला काही सुचत नव्हते, मी नुकताच एका कंपनीत जाॅईन झालो होतो.ती नोकरी सोडून जाणार कुठे मी? नाही म्हणायला हे हक्काचे छप्पर होते. पण घरात जीव रमत नव्हता. जरा कुठे सावरत होतो तेवढ्यात मी ज्या  कंपनीत नोकरीला होतो ती कंपनी बंद पडली. नोकरी गेली. घरी बसून बसून वेड लागायची वेळ आली.मी गावभर फिरत राहिलो. रात्री ही घरी यावे असे वाटत नव्हते. मग नाईट क्लबला जावू लागलो. मग तिथेच नोकरी मिळाली. आता रात्रीचा दिवस करतो अन् दिवसांची रात्र हे बरं अंगवळणी पडलय.”

“तुम्ही पुन्हा दुसऱ्या कंपनीत प्रयत्न का केला नाही.”

“आता पुन्हा कुठे श्री गणेश  करायचा? मला भीती वाटते चांगुलपणाची. आहे ते बरं आहे. जास्त अपेक्षा नाहीत जीवनाकडून.”

इंजिनीअर असून हा एका नाईट क्लबवर काम करतो हे काही तिच्या पचनी पडले नाही.

त्या दिवशी सम्यकच्या नांवे एक अपाॅईमेंटलेटर आले त्याला बेंगळुरूला जाॅयनिंग करायचे  होते. तो आश्चर्यचकित झाला. मी कुठेही ऍप्लिकेशन केले नव्हते, तर मला हे पत्र कसे आले. त्याने तिला विचारले तूला काही माहिती आहे. ती गालात हसली तसा तो समजला बोला हे पत्र कसे आले?

“तुम्हाला आनंद झाला नाही?”

“पण हे कसे शक्य आहे?”

“त्यात अवघड काम आहे? तुमची डिग्री चांगली, तुमचा कामाचा अनुभव चांगला, ती प्रमाणपत्रे इथंच मिळाली, मी फक्त दोन तीन कंपन्यात माहिती पाठवली. तुमचे काम झाले. जीवनात उमेद हारून चालत नाही. स्वत:ला ओळखलं पाहिजे. ‘चलती नाम गाडी है’?”

“खरच माझा माझ्यावरचा विश्वास संपला होता. माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खुप आनंदी आहे. आता माझ्या गुणांचे चीज होईल. मला उद्या निघायला पाहिजे.”

“आणि मला ही हे घर सोडावे लागले. मी तयारी करते.”

“ते का?”

“तुम्ही बेंगळुरूला जाणार. तर मला ही घर सोडावे लागेल ना.”

“नाही मी एकटाच जाणार. ह्या घरात तुम्ही रहायचं. हे घर तुम्ही सांभाळणार आहात. हा माझा निर्णय आहे. यावर चर्चा नको.”

समाप्त.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments