सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
बाबा हरहुन्नरी होते. ते चांगले लेखकही होते. त्यांची पत्रे वाचणे हा माझा एक हळवा अनुभव असायचा. कविताही करायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कविता छंदोबद्ध, शार्दूलविक्रीडित वृत्तात असायच्या. अप्रतिम अक्षर, मराठी आणि इंग्लिश पण. घोटीव, मोत्यासारखे. बघत रहावे असे. घडलेले प्रसंग, आयुष्यातला एखादा ह्दयस्पर्शी प्रसंग इतका छान वर्णन करून सांगायचे की आम्ही गुंग होऊन ऐकत रहायचो. ते एक उत्तम नाट्यकर्मी होते. त्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात देवमाणूस, तुझे आहे तुजपाशी, सारं कसं शांत शांत अशा अनेक नाटकातून त्यांनी कामे करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेतला आहे. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. तसेच नाट्यसंगीत ही त्यातल्या ताना आणि आलापांसह म्हणायचे. एकदा बाबा एक नाट्यगीत बाहेरच्या खोलीत म्हणत होते, आतून आईला वाटले, रेडिओवर लागलंय, म्हणून आई म्हणाली “अहो, रेडिओ जरा मोठा करा..”
चित्रकला हा त्यांचा आणखी एक गुण. त्यांनी कोळशानी रेखाटलेलं रविंद्रनाथ टागोरांचे रेखाचित्र इतके हुबेहूब आहे कि टागोरांच्या चित्राच्या डोळ्यांतून व्यक्त होणारे वात्सल्यपूर्ण भाव अजूनही, इतक्या वर्षांनी सुद्धा तसेच जाणवतात. राजूनं ते रेखाचित्र जपून ठेवले आहे.
आमची आजी, म्हणजे बाबांची आई गेली, तेव्हा सगळ्यांत लहान आत्या 2 वर्षाची होती. ती एकसारखी आई आई म्हणून रडत होती. तिला आई दाखवावी म्हणून या भावानं, आजीचा अंगठ्याच्या वरच्या पेराएवढा लहान फोटो होता, त्यावरून पेन्सिलीने फोटो म्हणजे आजीचं चित्र काढलं. आईचं इतकं खरं आणि तंतोतंत रूप बघून सगळीच भावंडे आईला बघून रडू लागली. ही आठवण एकदा बाबांनीच सांगितली आहे. आजीचा तो एकच फोटो आमच्या घरात कोल्हापूर ला उज्वलनं, माझ्या भावानं जपून ठेवलाय.
क्रमशः…
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈