सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ जीवनरंग ☆ आनंदाश्रम भाग-2 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
तुम्ही सगळ्यानी आमच्याकडे आणि निलीमाकडे येऊन रहायचे. आपण एक ठराविक रक्कम एकत्र काढायची. एक तरुण सुशिक्षित जोडपं आपलं care taker म्हणून ठेवायचं म्हणजे ती बाई आपलं चहापाणी, नाश्ता, जेवण, खाण्या पिण्याचे बघेल. नशिबाने आमच्यात पिणारे कोणी नव्हते म्हणा. आणि त्या जोडप्यांतला पुरुष सगळी बाहेरची कामं करेल. आपण फक्त खाना पिना, मज्जा करना. आणि आपले छंद जोपासणे. बरं त्यातून कधी कोणाला मुलांकडे जावेसे वाटले तर जाऊन यायचं. स्वतःच्या घरी दोन दिवस वाटलं तर जायचं. इतकंच काय पण स्वतःचं घर भाड्याने द्यायचे असेल तरी नंतर देऊ शकता. पण एक महिना बघू या. आपण सगळे कसे adjust होतो का? बरं वैद्यकीय मदत हवी तर एक बिल्डींग सोडून आमचे जुने जाणते डाॅक्टर आणि त्यांचा त्याच्याच सारखा हुशार डाॅक्टर मुलगा आणि क्लिनीक पण आहे. आपापल्या मुलांना विचारा. विचारपूर्वक निर्णय घ्या. आणि आठ दिवसाने सांगा.
रश्मीने शुभारंभाचा नारळ फोडला. ती म्हणाली “आपल्याला ही कल्पना एकदम 100% पटली.” दोन दिवस ती पेन्शनच्या कामासाठीं नाशिकहून दिरांकडून मुंबईला आली होती. माझ्याकडेच मी ठेवून घेतली होती. 2 दिवसासाठीं या स्वतःच्या घराची झाडझूड करा. रहा. चहापाणी सगळंच. त्यापेक्षा म्हटलं माझ्याकडेच रहा. आणि तुझी बाकीची बॅकेची सोसायटीची कामं कर. तिला मुलं बाळं नसल्यामुळे पती निधनानंतर “एकटी कशी रहाणार? आम्ही सगळे नाशिकला. वेळी अवेळी काही दुखलंखुपलं तर आमच्या चार नातेवाईकांत असलेली बरी” म्हणून नणंदेनी आणि जावेनी तिला तिच्या मनाविरुद्ध नाशिकला नेली. भक्कम पेन्शन, बॅंक जमा मजबूत, मुंबईत स्वतःचा फ्लॅट. ह्या वयात कामाला पण वाघ स्वभावाने पण शांत, निरुपद्रवी. अशा माणसाला ठेवायला कोण तयार होणार नाही? पण तिच्या मनाचा विचार कोण करणार? त्यामुळे माझी ही कल्पना तिला पटली. आणि मागचा पुढचा विचार न करता तिने होकार दिला.
माधुरी म्हणते कशी “माझा प्रतिक हो म्हणेल की नाही शंकाच आहे. सूनबाई तर तयार होणारच नाही.” प्रकाश म्हणाला, “आमची जान्हवी नाहीच म्हणणार तिच्या शुभ्राला आजी आजोबाच पाहिजे”. बाकीचे मुलांना विचारुन सांगतो असे गुळमुळीत उत्तर देऊन गेले.
क्रमशः …
© सौ. शशी नाडकर्णी -नाईक
फोन नं.8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सार्थक प्रयोग