सौ.ज्योत्स्ना तानवडे
☆ मनमंजुषेतून ☆ मी शाळा बोलतेय. ….! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे
अवघ्या विश्वावरी काळ कठीण आला
करोनाने अवचित घातला घाला
निसर्ग झालाय मुक्त
परी माणूस झाला बंदिस्त
माझ्या नशिबी आला विजनवास
मला विद्यार्थ्यांच्या भेटीची आस !!
नमस्कार मंडळी ! मला ओळखलं ना ? अहो, मी शाळा बोलतेय. हो ! तुमची, तुमच्या मुलांची, नातवंडांची शाळा.आत्ताच्या बंदीवासाने खूप आलाय कंटाळा. खरं सांगू का,
मुलं म्हणजे माझा प्राण,
मुलं म्हणजे माझ्या वास्तूची शान,
मुलं म्हणजे माझ्या जगण्याचे भान,
मुलं म्हणजे माझ्या अस्तित्वाचा मान !!
पण आता आम्ही एकमेकांना पारखे झालोय. कधी एकदा हे संकट दूर होतेय आणि कधी आम्ही भेटतोय असं झालंय मला.
अहो, माझी आणि मुलांची साथ-संगत कैक वर्षांपासूनची आहे. अगदी सुरूवातीला शाळा कोणाच्यातरी घरात, एखाद्या वाड्यात भरत असे. मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी शाळा होती. कापडी पिशवीचे दप्तर, स्लेटची जडशीळ पाटी-पेन्सिल होती. शाळेचा ड्रेस एकदम साधा होता. मुली तर दोन वेण्या, साडी, दोन खांद्यावर पदर अशा वेषात असायच्या. काळाबरोबर राहणीमानात, वागण्या-बोलण्यात, जगण्यात अनेक बदल होत गेले. हळूहळू माझेही सगळे चित्र बदलत गेले.
मुला-मुलींची शाळा एकत्र झाली. भारी युनिफॉर्म, टाय-बूट आले. खेळांचे स्वरूप बदलले. आता वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा यांची रेलचेल झाली आहे. स्नेहसंमेलनंही खूप छान आयोजली जातात. मुलांचे विविध कला-गुणदर्शन पाहून मला खूप आनंद होतो. यातूनच अनेक चांगले कलाकार पुढे नावारूपाला आले.
अनेक डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, व्यापारी, खेळाडू उदयाला आले. त्यांनी उत्तम करिअर केले. त्यांनी स्वतःबरोबरच माझेही नाव मोठे केले. मला यशस्वी, कीर्तीवंत बनविले.
स्पर्धा गाजवणाऱ्या मुलांचे वक्तृत्व, गायन ऐकून माझे कान तृप्त होतात. त्यांचे खेळ, चित्रकला, नाट्यकला, नृत्यकला कौशल्य पाहून माझे डोळे तृप्त होतात. मन आनंदाने भरून येते. मी त्यांना मनोमन शुभेच्छा देते, आशीर्वाद देते. माझी ही सगळी गुणवान लेकरे देशात-परदेशात खूप नाव कमावतात. यशस्वी होतात. पण मला विसरत नाहीत.
आता तंत्रज्ञान बदलले. ह्या नव्या “स्मार्ट” युगात हे सगळे एकमेकांपासून दुरावलेले जीव पुन्हा एकत्र आले. पुन्हा गळ्यात पडून हसले-रडले-बागडले. सर्वजण मिळून मला भेटायला आले. किती किती आनंद झाला म्हणून सांगू? ते मला कोणीही विसरत नाहीत, उलट मला आणखी समृद्ध करून जातात. मन खूप भरून येतं अशावेळी.
मी मनापासून माझ्या या लेकरांना आशीर्वाद देते. त्यांच्या यशाची, कीर्तीची कामना करते. माझं आणि त्यांचं भावविश्व खूप वेगळं आहे. सदैव एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. ते असंच राहावं आणि माझी लेकरं सुखात, आनंदात रहावीत हीच मी देवाला प्रार्थना करते.
“देवा दयाघना, लवकर हे संकट दूर कर. माझ्या मुलांची आणि माझी भेट घडव. डोळ्यात प्राण आणून मी त्यांची वाट पहाते आहे. माझे सगळे वर्ग, माझी घंटा, प्रयोगशाळा, कलादालन, खेळाचे मैदान मूक रुदन करते आहे. मुलांची वाट पहात आहे.लवकर हा काळ संपू दे आणि पुन्हा माझा सगळा परिसर हसता खेळता होऊ दे. मुलांचे हसणे, ओरडणे, दंगा ऐकायला मी आसुसले आहे. आता सगळे पुर्ववत होऊ दे.”
पुन्हा घणघणू दे माझी घंटा
धावत येतील माझी लेकरे
प्रार्थना घुमेल माझ्या दारी
माझ्या वर्गांची उघडू दे दारे ||
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈