श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
१९७७ मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहिशीझाली. `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.
आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी आण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले, की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना, त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळू हळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून आण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात आण्णांना नेमके काय हवे, कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, आण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.
वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा आण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता आण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात आण्णांची बोलण्याची, लिहिण्याची घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.
प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं, हाही आण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळू हळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं, पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. आण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वास्वानींच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कतृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी `मानवतेचा दीपस्तंभ’ या दोन भागात केले. या सार्या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.
उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, आण्णांना लेखनात मदत करत राहिली. आण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. आण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर आण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली, कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या ८९ जुलैमध्ये कालवश झाल्या.
क्रमश: —-
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈