श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
वहिनी गेल्या. नंतर आण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरी निमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. आण्णाचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून, मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने आण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. आण्णांची आई बनून तिने आण्णांना जेवू घातले.
वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. आण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी, आई-वडील, भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्यांची ख्याली-खुशाली विचारून, घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी आण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. आण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’ आण्णा म्हणायचे, म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, `मग तुमचं कोण करणार?’ ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’ पण ती म्हणायची, ‘मी वहिनींना वचन दिलय, शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार!’
उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. आण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् तीदेखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.
आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’ म्हणायचा. पण आण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलय.. देहदान केलय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु, जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं, हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती, त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरुऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात, त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर, आई-वडील, भाऊ, मुलगा या सार्यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता आण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. `ऋणानुबांधाच्या गाठी’ हेच खरं!
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈