श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘अरे यार, या सुमेशला काय म्हणावं तरी काय? इकडे डायबेटीस आहे, पण आपल्या हिश्श्याची मिठाई काही सोडत नाही. बघ .. बघ… तिकडे बघ… रसगुल्ला आणि बर्फीचे दोन पीस उचलून गुपचुप आपल्या पिशवीत ठेवलेत.’ विनोदाची नजर सुमेशकडे लागली होती.
‘मुलांसाठी घेतली असेल. आपल्याला काय करायचय.’ मी म्हंटलं, ’तू आपला खा. पी. आणि पार्टीची मजा घे.’
‘याला कुठे लहान मुले आहेत? म्हणजे एक-दोन पीसमध्ये खूश होऊन जातील.’ विनोद म्हणाला. ‘बघ .. बघ… आता समोसा पिशवीत ठेवतोय. मोठा कंजूष माणूस आहे. जे खाल्लं जात नाही, ते लोक प्लेटमधे तसंच ठेवतात. पण हा कधी टाकत नाही. कुणास ठाऊक, घरी जाऊन काय करतो त्याचं?’
‘काय वाटेल ते करेल. त्याची मर्जी. त्याच्या वाटणीचं आहे ते सगळं. तुझंसुद्धा लक्ष ना, या असल्याच गोष्टींकडे असतं.’
‘ते बघ! तो सगळं सामान घेऊन चाललाय. बघूयात काय करतोय!’ विनोद हेरगिरी करण्याच्या मागे लागला.
‘जाऊ दे ना रे बाबा,’ मी टाळाटाळा करत म्हंटलं.
‘चल रे बाबा,’ म्हणत त्याने मला जवळ जवळ ओढतच बाहेर नेलं।
बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं, रसगुल्ला, बर्फी, सामोसे वगैरे घातलेली पिशवी, गेटपाशी उभ्या असेलया दोन मुलांकडे देत होता. ती मुले जवळच्याच झोपडीत रहात होती आणि आस-पास खेळत होती.
मी म्हंटलं, ‘ बघ! आपल्या हिश्श्याचा उपयोग याही तर्हेने करता येतो. ‘ विनोद काही न बोलता नुसता उभा होता.
मूळ कथा – ‘अपना हिस्सा’ – मूळ लेखक – श्री विजय कुमार,
सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈