श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
यंदा दिपक दहावीला होता. एकुलता एक लाडका हुशार मुलगा. त्यामुळे घरात तसेच शाळेतही त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा खूप होत्या. तो शाळेच्या निवडक मुलांच्या बँचमध्येही होता. ह्या बँचचा खुपसा पोर्शन शाळेत व क्लासमध्येही शिकवून झाला होता. जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि दोन महीने झाल्यावर शाळेत दिपकची पहिली चाचणी परिक्षा झाली. ह्या परिक्षेचे पेपर निवडक मुलांसाठी वेगळे होते. त्यांना आतापर्यंत शिकवून झालेल्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित होती. त्या परिक्षेत दिपकला नेहमीपेक्षा खूप कमी मार्क पडले. हल्ली त्याची सारखं डोकं दुखत असल्याची तक्रार सुरू होती. पण ते सर्दीमुळे किंवा अभ्यासाच्या ताणामुळे असेल असे वाटून थोडे दुर्लक्ष केले गेले. मार्क कमी पडल्याने त्याला आईबाबांचा व शाळेत शिक्षकांचाही फार ओरडा खावा लागला. पण दिपकच्या आजीआजोबांच्या मनाला मात्र ही गोष्ट फार खटकली. कारण दिपक हा फार सिन्सिअर मुलगा, उगीचच नाटकं करणारा नव्हता. आणि ते दोघेही जास्त वेळ घरात असल्याने त्यांनी त्याच्या डोकेदुखीचे निरिक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही डोकेदुखी थोडी वेगळी आहे. दिपकचं जेव्हा डोक दुखत असे तेव्हा तो फार बेचैन व अस्वस्थ होत असे. डोकं तो जोराने दाबुन धरत असे, आणि चेहराही फार विचित्र करत असे. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असे. थोड्या वेळानं वेदना कमी झाल्यावर मग तो ठिक असे. त्याला केव्हातरी किरकोळ तापही येई. तापावरच औषध घेतले की तो उतरे. पण नंतर तो शांत असे. शाळेचा व क्लासचा अभ्यास तो कसातरी पुर्ण करत असे. जास्त खेळतही नसे.ही लक्षणं काही बरोबर नव्हती. काहीतरी योग्य पावलं उचलायला हवी होती. नाहीतर काही खर नाही, असे त्यांना वाटत होते. म्हणून ही गोष्ट त्यांनी विश्वासच्या म्हणजे दिपकच्या वडीलांच्या लक्षात आणून देण्याचे ठरवले. मग त्याच दिवशी दुपारी विश्वास जेवायला घरी आल्यावर विश्वासला जवळ बोलावून ते म्हणाले, “विश्वास मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे दिपकच्या बाबतीत. माझी एक गोष्ट ऐकशील का?”
“हो बाबा बोला. “विश्वास म्हणाला.
“अरे, दिपकचं हल्ली वरचेवर दुखतं. किरकोळ तापही असतो. त्याला, काही वेळा त्या वेदना सहन होत नाहीत. बाकी इतरवेळी तो ठिक असतो. पण मला काही ही लक्षण बरोबर दिसत नाहीत. त्याची लवकरच नीट तपासणी करायला हवी.” आजोबा म्हणाले.
“होय. ते माझ्याही लक्षात आलंय बाबा. पण या कामांमुळे वेळच मिळत नाही.” विश्वास म्हणाला.
“अरे, मग वेळ काढ. जरा बाजूला ठेव तुझी कामं. त्यांना विलंब झाला तरी चालेल. पण हे काम महत्त्वाचे आहे ते आधी कर.दिपकला एखाद्या चांगल्या डॉक्टराला दाखवून नीट इलाज लवकर व्हायला हवेत.” आजोबा म्हणाले.
“हो मी वे काढतो लवकरच.” असं म्हणून विश्वास परत कामावर गेला.
क्रमशः
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈