सौ. राधिका भांडारकर
☆ विविधा ☆ आकाशाशी जडले नाते – श्री जयंत नारळीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
नाशिक येथे भरणार्या ९४व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माननीय वैज्ञानिक जयंत नारळीकर यांची निवड झाली त्या निमीत्ताने…. अर्थात् माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या व्यक्तीने एका प्रचंड बुद्धीमान व्यक्तीविषयी काही भाष्य करणे हे निव्वळ धाडसाचे…. नारळीकर हे मूळचे पारगावचे. तेथे ऐकलेल्या गोष्टीनुसार असे की, नारळीकरांच्या परसांत आंब्याची झाडे होती. आणि या आंब्याच्या झाडांना नारळा एवढे आंबे लागायचे, म्हणून त्यांचे नाव “नारळीकर” असे पडले.
डाॅ.जयंत नारळीकर यांची आत्मकथा “चार नगरातले माझे विश्व”
बनारस, केंब्रीज, मुंबई आणि पुणे….प्रत्येक संक्रमणाच्यावेळी, त्यांना आपण एक धाडस करतो असे वाटायचे. बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात पदार्पण करताना आपण आपल्या माणसांपासून दूर एकटे आहोत ही जाणीव त्यांना व्यथित करायची… केंब्रीज सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हां, “कशाला हे धाडस करता?”
हे विचारणारे अनेकजण भेटले. पण तेव्हांसुद्धा, देशबांधवांकरिता काहीतरी सकारात्मक आपल्या हातून घडावे हा विचार प्रेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुसर्या नगरात, शून्यातून, आयुका ही नवीन संस्था निर्माण करण्याचे आवाहन स्वीकारणे हेही धाडसाचेच होते… बी.एस.सी. पदवी प्राप्तीनंतर, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेऊन त्यांनी केंब्रीज विद्यापीठात पदार्पण केले.
रँग्लर किताब, टायसन स्मिथ्स, अॅडम्स आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत खगोलशास्रातील सापेक्षतावाद, पूंजवाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र यामधे विलक्षण संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजेच त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधील वास्तव्य.. एका परिषदेत इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले, “भारताचे विभाजन झाले, तेव्हां ज्या हिंदु मुस्लीम कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबविता आल्या नाहीत?”
नारळीकर ताबडतोब ऊत्तरले! “विभाजन ब्रिटीशांनी घडवले! ते अस्तित्वात येत असताना,कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती.”
पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही या भाष्याला अनुमोदनच दिले. ते “ब्रिटीश” प्राध्यापक, गप्प, झाले. दोघांत भांडण लावून गंमत पाहण्याचे त्यांचे खोडसाळ धोरण त्यांच्यावरच ऊलटले.
स्वत:ला जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकांमधे आणि विज्ञानविश्वात सिद्ध केल्यानंतर स्वदेशी परतण्याच्या भूमिके बद्दल ते सांगतात, “माझ्या मनात परदेश वास्तव्याबद्दल एक ऊपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विवीध गोष्टींसाठी करावी लागणारी धावपळ, कमी पगार, लालफीत, अधिकारशाही.. हे विचारात घेऊनसुद्धा मी आपल्या देशात, आपल्या माणसात आहे, ही भावना सगळ्यांवर मात करत होती…”
जीवनाबद्दलची कमीटमेंट त्यांना महत्वाची वाटते. ज्या देशाने त्यांना शिष्यवृत्ती देऊन यशाची वाट दाखवली, त्या देशाचं देणं द्यायला पाहिजे, हे महत्वाचं वाटतं.
स्वाक्षरी मागण्यार्या विद्यार्थ्यांना ते सांगतात, “इथे मी तुला स्वाक्षरी देणार नाही, पण तू मला एक पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा प्रश्न विचार. मी त्याला स्वाक्षरीसकट ऊत्तर पाठवेन.”
नंतर या प्रश्नोत्तरातूनच, “सायन्स थ्रु पोस्टकार्डस्.” असे लहानसे पुस्तक प्रकाशित झाले.
एक प्रश्न त्यांना विचारला जातो, “तुमचा देवावर विश्वास आहे का?”
प्रश्न विचारण्याला ‘हो’ किंवा ‘नाही’ असे एकशब्दी ऊत्तर अपेक्षित असते. पण तसे ऊत्तर ते देत नाहीत. कारण त्यांच्या मते देव आणि विश्वास या संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहेत. सोपे ऊत्तर एवढेच, की एका परम शक्तीने विश्व निर्माण केले व त्याचे नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक नियम ठेवले. त्या ‘परम शक्तीला देव म्हणता येईल.
वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? याबद्दलही ते सांगतात, “कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने, पुष्टी देऊन मिळाल्याशिवाय, बरोबर मानायचा नाही आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, त्याच्याकडुन वेळोवेळी नवी भाकिते यावीत, ज्यांची तपासणी करुन, मूळ तर्काचे खरेखोटेपण, ठरवता येते. तर्कशुद्धी विचारसरणी यालाच म्हणतात…
मा. जयंत नारळीकर यांचे व्यक्तीमत्व अनेक पैलु असलेले बहु आयामी आहे…ते वैज्ञानिक, तत्वचिंतक आणि साहित्यिकही आहेत. तसेच कला क्रीडा संगीत जाणणारे रसिक आहेत. एक जबाबदार सुपुत्र,चांगला पती आणि आदर्श पालकही आहेत. ज्यांच्या नावातच श्रीफळ आहे, त्याने विज्ञानाच्या या कल्पवृक्षाची जोपासना केली.. नुसतेच आकाश बघणार्या तुम्हांआम्हाला आकाशाच्या अंतरंगात बघण्याची गोडी लावली…
भारतरत्नाच्या दिव्यत्वाच्या या प्रचीतीला माझे हात सदैव जुळतील….
धन्यवाद!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈