सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ९) – राग~ रागसारंग ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
मागील आठवड्यांत सूर्योदय कालीन राग ललत संबंधी विचार मांडल्यानंतर आज मध्यान्ह काळचा अतिशय लोकप्रिय राग सारंग विषयी या लेखांत विवरण करावे असा विचार मनांत आला.
काफी थाटांतील हा राग! गंधार व धैवत वर्ज्य, म्हणजेच याची जाति ओडव. शुद्ध व कोमल असे दोन्ही निषाद यांत वावरत असतात, आरोही रचनेत शुद्ध आणि अवरोही रचनेत कोमल याप्रकारे दोन निषादांचा उपयोग. नि सा रे म प नि सां/सां (नि)प म रे सा असे याचे आरोह/ अवरोह. निसारे, मरे, पमरेसा या सुरावटीने सारंगचे स्वरूप स्पष्ट होते.वादी/संवादी अर्थातच अनुक्रमे रिषभ व पंचम.
स्वरांमध्ये थोडा फेरफार करून आणि रागाची वैषिठ्ये कायम ठेवून गानपंडितांनी सारंगचे विविध प्रकार निर्मिले आहेत.
उपरिनार्दिष्ट माहीती प्रचलित ब्रिन्दावनी सारंगची आहे.हिराबाई बडोदेकर यांची “मधुमदन मदन करो”ही ब्रिन्दावनी सारंगमधील खूप गाजलेली बंदीश. तसेच “बन बन ढूंढन जाओ”ही पारंपारीक बंदीश प्रसिद्ध आहे.”भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी”,”बाळा जोजो रे”,”साद देती हिमशिखरे” हे नाट्यपद,”संथ वाहते कृृष्णामाई” ही सर्व गाणी म्हणजे ब्रिन्दावनी सारंगचे सूर.
शुद्ध सारंगः हा राग ओडव/षाडव जातीचा कारण ह्यात शुद्ध धैवत घेतला जातो.दोन्ही मध्यम घेणे हे शुद्ध सारंगचे स्वतंत्र अस्तित्व. तीव्र मध्यमामुळे हा सारंग थोडा केदार गटांतील रागांजवळचा वाटतो. अवरोहांत तीव्र मध्यम घेऊन लगेच शुद्ध मध्यम घेतला जातो. जसे~ सां (नि )ध प (म)प रे म रे, निसा~~ अशी स्वर रचना फार कर्णमधूर भासते.सुरांच्या ह्या प्रयोगामुळे त्यांत एकप्रकारचा भारदस्तपणा जाणवतो.
“निर्गुणाचे भेटी आलो सगूणासंगे” हा रामदास कामतांनी प्रसिद्ध केलेला अभंग, “शूरा मी वंदिले” हे मानापमानांतील नाट्यगीत, “दिले नादा तुझे हुआ क्या है” ही मेहेंदी हसनची सुप्रसिद्ध गझल ही शुद्ध सारंगची उदाहरणे देता येतील.
मधमाद सारंगः सारंगचेच सर्व स्वर ठेवून मध्यमाला महत्व दिले की झाला मधमाद सारंग. “आ लौटके आजा मेरे मीत हे रानी रूपमतीतील गीत हे या रागाचे उदाहरण.
सामंत सारंगः हा राग म्हणजे सारंग आणि मल्हार यांचे मिश्रण. सारंगप्रमाणे यांत धैवत वर्ज्य नसतो.सारंगचाच प्रकार असल्यामुळे मरे, रेप ही स्वर संगति दाखवून रिषभावर न्यास करून म रे म नि सा हे सारंगचे अंग दाखविणे अनिवार्य आहे. पूर्वार्धात प्रामुख्याने सारंग अंग व ऊत्तरार्धांत (नि )ध नी सा (नी) प असे मल्हार अंग म्हणजे सामंत सारंग.
बडहंस सारंगः ब्रिन्दावनी सारंगमधेच शुद्ध गंधार वापरून बडहंस तयार होतो.
लंकादहन सारंगः कोमल गंधार घेऊन ब्रिंदावनी गायला की झाला लंकादहन.
गौड सारंगः सारंगच्या प्रकारातील हा अतिशय प्रचलित राग.जरी सारंग असला तरी ह्याची जवळीक अधिक केदार कामोदशी आहे. कारण शुद्ध व तीव्र दोन्ही मध्यमांची यांत प्रधानता आहे.पध(म)प किंवा ध (म)प हे स्वर समूह वारंवार या रागाचे स्वरूप दाखवितात.केदार प्रमाणेच प प सां असा अंतर्याचा उठाव असतो. प्रामुख्याने स्वरांची वक्रता हा या रागाचा गुणधर्म!सारंग जरी काफी थाटोत्पन्न असला तरी हा गौडसारंग कल्याण थाटांतील मानला जातो.
“काल पाहीले मी स्वप्न गडे” हे गीत श्रीनिवास खळ्यांनी गौड सारंगमध्ये बांधले आहे. या रागाचे उत्तम उदाहरण म्हणजे हम दोनो या चित्रतपटांतील “अल्ला तेरो नाम” हे भजन.
भर दुपारी गायला/वाजविला जाणारा सारंग हा शास्त्रीय राग! सूर्य डोइवर आला आहे,रणरणती दुपार,कुठेतरी एखाद्या पक्षाचे झाडावर गूंजन चालू आहे,कष्टकरी वर्गांतील काही मंडळी झाडाच्या पारावर बसून शीतल छायेत भोजनाचा आस्वाद घेत आहेत, अशावेळी हवेची एखादी झुळूक येऊन वातावरणांत गारवा निर्माण व्हावा तसा हा शीतल सारंग म्हणता येईल.या रागांचे स्वर कानावर पडतांच सगळ्या चिंता, काळज्या दूर होवून मन प्रसन्नतेने व्यापून राहिल्याचा प्रत्यय येतो.ह्या रागासंबंधी असे म्हटले जाते की हा राग ऐकत ऐकत भोजन केले तर ते अधिक रुचकर लागते. स्वर्गीय आनंद देणार्या या रागाने दुपारच्या भगभगीत समयाचे सोने केले आहे.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈