सौ. ज्योत्स्ना तानवडे
☆ काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
रसग्रहण:
आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मागे वळून कवीने आपल्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. तरुणपणी प्रेम यशस्वी झाले नाही, उमेदीच्या वयात अपेक्षित यश मिळाले नाही, ज्या वयात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत, त्यांची फक्त आठवण काढलेली आहे. आता अशी वेळ आहे की, यापुढे या इच्छा पूर्णच होऊ शकणार नाहीत.
दोघे एकेकाळचे प्रेमिक. पण प्रेम असफल झालेले. पुन्हा आता त्यांनी भेटून काय होणार? देणे घेणे खूप झाले. पण सर्व व्यर्थ गेले. आता हातात राहिलेल्या श्वासांच्या भरोशावर काहीच करता येणे शक्य नाही. या भेटीतून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण माझा काळ सरला आहे आणि तुझी वेळ ही टळून गेलेली आहे अशी अवस्था आहे.
तीच गोष्ट आयुष्यातील यशापयशाची. तेव्हा तारुण्याचा बहर होता. मनात जिद्द होती. ध्येयपूर्तीचा ध्यास होता. त्याच मुळे हाती असलेल्या गोष्टींच्या मदतीने (सरूप) यशाच्या प्राप्तीचे (अरूप) चित्र मनात रेखाटले जात होते. पण ते जमले नाही. त्यावेळी अपयशाची भीती होती. तिचे पण आता वय झाले म्हणजे यश-अपयश यांचे आता काहीच वाटत नाही. मन त्याच्या पलीकडे गेलेले आहे. त्यामुळे यशाच्या अपेक्षेने एवढा मोठा डोलारा सांभाळण्यात काहीच अर्थ नाही. कारण आता माझा काळ सरत आलाय आणि यशाची ती वेळही टळून गेली आहे.
कवी श्री वैभव जोशी
हे ईश्वरा, तेव्हा तुझी खुप प्रार्थना केली. पण व्यर्थ गेली. आता माझ्या प्रार्थनेत तेवढी आर्तता, तेवढे बळ राहिलेले नाही आणि तुझ्याकडे माझ्यासाठी कृपेचे दानही नाही. आता मी ऐलतीरी आणि माझी नजर पैलतीरी लागली असताना सर्व देव मला सारखेच वाटायला लागले आहेत. आता या सरत्या आयुष्यात मनामध्ये फक्त प्रेमाची, कष्टांची, श्रद्धेची आठवण जागी आहे. त्यामुळेच मनात भावनांची ओल टिकून आहे. पण आता याहून वेगळे काही होणारच नाही कारण या सगळ्यांची वेळ टळून गेली आहे आणि माझा काळही सरला आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्यातील अप्राप्य राहिलेल्या गोष्टींच्या आठवणीने कवी सदगदीत होतो. या गोष्टींना उजाळा देतो आहे. यातून एक जाणवते हव्या असलेल्या गोष्टी त्याचवेळेस मिळाल्या तर त्यांचा आनंद वेगळाच असतो.
(चित्र – साभार फेसबुक वाल)
© सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈