डॉ मेधा फणसळकर

 ☆ विविधा ☆ घडवं घडवं रे सोनारा….. भाग-2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

तेवढ्यात एका बदामाच्या आकाराच्या छोट्या संदुकीतून खुडबुड ऐकू येऊ लागली. सगळे तिकडे बघू लागले तर चार- पाच कर्णफुले, मोत्यांची कुडी, इअररिंग्ज, बुगडी आपापसात भांडताना संदुकीचे झाकण उघडले होते. आत एकत्र बसून त्यांचे अंग आंबले होते. कुडी कर्णफुलाला म्हणाली,“ मी या घरात सात पिढ्यापासून आहे. म्हणून सगळ्यांनी जपून ठेवलंय. तू काल- परवा आलीस आणि मिजास दाखवतेस होय? उर्मिला तर हल्ली तुझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही. लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्यानेच तुला तिच्यासाठी आणले. थोडे दिवस तुला भरपूर मान मिळाला आणि मग या इअररिंगची फॅशन आली. मग तुला माझ्याशेजारीच येऊन बसावे लागले. आता ही रिंग पण बाजूला पडली आणि उर्मिलेने नवीन फॅशनचे कानातले केले आहे. आधीच तू तुझ्या काट्याने मला सारखी टोचत होतीस आणि आता ही रिंग! सतत आपल्या रिंगणात आपल्याला अडकवत राहते. म्हणूनच आज सुटका करुन घेतली. मोकळ्या हवेवर किती बरे वाटतेय.” कुडी, कर्णफुले, इअररिंग्ज इकडे- तिकडे बागडू लागल्या तेवढ्यात उर्मिलेने खोलीत पाऊल टाकले. दागिन्यांच्या पेटीतील दागिने असे पसरलेले पाहून तिच्या लक्षात आले की हे लेकीचेच काम असणार! तिने रागाने लेकीला हाक मारुन विचारले असता लेक म्हणाली, “ अग ठेवतच होते ग आई! कोल्हापुरी साज नक्की असाच असतो का ते नेटवर बघत होते. आई अगदी तस्साच आहे  बरं का तो! आणि तो कंबरपट्टा आणि मोत्यांची नथ पण हवी आहे  मला उद्यासाठी!”  “ बरं बरं तुला काय हवंय ते घे यातले. पण बाळा, हे सगळे दागिने म्हणजे आपली आज्जी- पणजी यांची आठवण आहेत हो! त्यामुळे नीट नाजूकपणे ठेव. ती कानातली बघ कशी इकडे तिकडे विखुरली आहेत. ती नीट ठेव बघू. उद्या हे सर्व दागिने तुला आणि राजूच्या बायकोलाच देणार आहे मी!” त्यावर लेक लगेच म्हणाली,“ शी आई! असले दागिने कोण वापरतय आजकाल? मी आपली उद्याच्या दिवस कार्यक्रमासाठी घालणार. असले सोन्याचे दागिने हल्ली outdated झालेत ग. आजकाल प्लॅटिनमचे तरी वापरतात, नाहीतर फॅब्रिकचे दागिने एकदम बेस्ट! कोणत्याही ड्रेसवर चांगले दिसतात ग. जरा शिकले तर आपल्याला घरी पण करता येतात. मुख्य म्हणजे स्वस्त आणि use & throw ! उगाच सांभाळत बसायचे टेन्शन नाही.”

ते ऐकून उर्मिला काहीच बोलली नाही. पण एकेक दागिना हातात घेऊन ती हळुवार त्यावर हात फिरवू लागली. आपली सासू, आजेसासू, आई यांच्या एकेक आठवणी प्रत्येक दागिन्यातून तिच्या मनात फेर धरु लागल्या. मग हळुवार एकेक दागिना आत ठेवत ती मनातच म्हणाली, “ दागिन्यांची आवड प्रत्येक स्त्रीला जन्मजातच असते. भले ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या  प्रकारची असेल. पण एकही दागिना अंगावर नाही अशी बाई सापडणे विरळाच! अगदी आदिवासी भागात सुद्धा सोन्याचे नाहीत पण फुलांचे-पानांचे तरी दागिने त्या बायका अंगावर मिरवतातच. आणि दागिन्यांच्या फॅशन काय? आज येतात आणि उद्या जुन्या होतात. मी सुद्धा  काळानुसार काही काही दागिने नवीन फॅशनचे बनवून घेतलेच की!पण आता माझ्या लक्षात येतंय की पुन्हा जुन्याच दागिन्यांना नवीन लेबल लावले जाते आणि नवीन फॅशन म्हणून खपवले जाते. म्हणूनच माझा हा ठेवा मला जपून ठेवायला पाहिजे. कसले use& throw ? थोडे दिवसांनी त्याची पण फॅशन ही नवी पिढी throw करणार आणि या जुन्या दागिन्यांचा पुन्हा use करणार  हे नक्की! ” असे म्हणून तिने सर्व दागिने आपापल्या जागेवर पुन्हा नीटनेटके ठेवले. मालकीणीचा हात फिरल्याने खूष होऊन दागिन्यांनी पेटीत पुन्हा ऐटीत आपली जागा पटकावली आणि ते आनंदाने अधिकच झळाळू लागले.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments