श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ लोकसाहित्य – जात्या तू ईश्वरा – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकएकटा राहणारा माणूस समूहाने टोळ्या करून राहू लागला. पुढे त्यातून कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. परस्परांच्या भावना , विचार व्यक्त करण्यासाठी आधी हालचाल, हावभाव, मुद्राभिनय, ध्वनी इ. चा वापर व्हायचा. हळू हळू भाषा विकसित होऊ लागली. भाषेद्वारे आपले विचार, भावना अधीक परिणामकारकपणे व्यक्त करता येऊ लागल्या. तेव्हापासून लोकवाङमय निर्माण होऊ लागलं असणार. शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी संस्कृती अधिकाधिक विकसित होऊ लागली. संस्कृतीबरोबरच भाषाही विकसित होऊ लागली. भाषा विकासाबरोबरच वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण लोकवाङमय निर्माण होऊ लागले. लोकसाहित्य तर भाषा विकासाच्या आधीपासून निर्माण झाले असणार. लोकसाहित्य हा शब्द व्यापक आहे. त्यात लोकवाङमयाबरोबरच चित्रकला, संगीत, नृत्य इये. अनेक लोककलांचा समावेश होतो. तरीही बहुतेक वेळा लोकसाहित्य हा शब्द लोकवाङमय याचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. या लेखातही लोकवाङमय या अर्थी लोकसाहित्य हाच शब्द वापरला आहे.
लोकसाहित्याची परंपरा अतिशय पुरातन आहे. डॉ. तारा भावाळकर म्हणतात, ‘लोकसाहित्याची मुळे प्राचीन वैदिक वाङमयात आढळतात.’ लोकसाहित्याची व्याख्या अनेकांनी केली आहे. त्यात भारतीय तसेच पाश्चात्य अभ्यासकही आहेत. त्या आधारे त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. ते मौखिक किंवा अलिखित स्वरुपात असते. ( अर्थात मुद्रण शोधांनंतर अलीकडच्या काळात त्यांची संकलने प्रकाशित झाली आहेत. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे ते संक्रमित होते. त्यात पारंपारिकता असते. हे व्यक्तीने निर्माण केलेले असले, तरी त्याला असे स्वरूप प्राप्त होते की ते व्यक्तीचे न राहता समाजाचे बनते. लोकसाहित्यातून लोकसंस्कृतीचा आविष्कार जसा होतो, तसाच तो व्यक्तीच्या भाव-भावना, विचार, अनुभव , प्रकृती, प्रवृत्ती यांचाही आविष्कार होतो.
भारतातील प्रमुख भाषांच्या लोकसाहित्यात लोकसंस्कृतीचे काही समान घटक आढळतात. सर्व भाषांमधल्या लोकसाहित्यात विविध प्रसंगी गायली जाणारी, सण-उत्सवाच्या प्रसंगी गायली जाणारी गीते, शेता –शिवारात, घरात, काम करताना म्हंटली जाणारी श्रमपरिहाराची गीते, खेळगीते, ऋतुगीते अशी अनेक प्रकारची गीते आढळतात. लोकगीते पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही रचली, म्हंटली आहेत. या लेखात मात्र विचार करायचा आहे तो स्त्री गीतांचा.
सरोजिनी बाबर म्हणतात, ‘भारतातील अन्य पारंपारिक स्त्रियांप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल, अशा जागा नाहीत. सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो. अशी स्त्री मग, जाते, उखळ, मुसळ, पाणवठा आशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जिव वस्तूंनाच आपले सखे सवंगडी बनवून त्यांच्यापाशी आपले मन मोकळे करते. प्रसंगी आपल्या समवयस्क सखीशी मन मोकळं करून ती बोलते. शेजीबाईला उद्देशून तिने खूप ओव्या म्हंटल्या आहेत.’ आपल्या भावना, आपले विचार, आपले अनुभव, आपली जवळची, दूरची नाती याबद्दल तिने मोकाळेपणाने ओव्या गायल्या आहेत. यापैकी तिने आपल्या ‘बाळराजा’बद्दल, आपल्या ‘हावशा भ्रतारा’बद्दल, आपल्या ‘ताईता बंधुराजा’बद्दल, ‘तीर्थस्वरूप आई-वडलां’बद्दल जे जे म्हंटले आहे त्याचा, त्यातून व्यक्त झालेल्या तिच्या भाव-भावनांचा, अनुभवांचा आणि त्यातून दिसणार्या तिच्या स्थिती-गतीचा विचार इथे करायचा आहे. जवळच्या नात्यातून तिचे जे भावबंध उलगडत गेलेले दिसतात, तेवढ्यापुरतेच या लेखाचे विवेचन मर्यादित आहे.
क्रमश: ….. पुढील लेखात राजस बाळराजा
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈